मराठी संगीत क्षेत्रात एक काळ जी. एन. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे, सुधीर फडके, अरुण दाते, लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर आदींसह अनेक गायकांनी सुमधुर भावगीतांनी गाजवला. अर्थात यात गीतकार आणि संगीतकार यांचाही मोठा वाटा होता. मराठी संगीतासाठीचे ते सुवर्णयुग होते. भावगीतांच्या या सुवर्णयुगात मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या, अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांनी गायलेल्या आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘शुक्रतारा मंदवारा’ गाण्याने इतिहास घडविला. या गाण्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
‘शुक्रतारा मंदवारा’ गाण्याचा सुवर्ण महोत्सव, अरुण दाते यांच्या वयाची पूर्ण झालेली ८० वर्षे आणि त्यांच्या गायन कारकिर्दीची पंचावन्न वर्षे या साऱ्याचा योग साधून अतुल थिएटर्सतर्फे येत्या १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ भावगीत गायक जी. एन. जोशी ते सुरेश वाडकर यांच्यापर्यंतच्या भावगीतांचा प्रवास  सादर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात गजाननराव वाटवे यांची कन्या मंजिरी वाटवे-चुणेकर, सुधीर फडके यांचे सुपत्र व संगीतकार- गायक श्रीधर फडके आणि स्वत: अरुण दाते यांच्यासह धनंजय म्हसकर, सुवर्णा माटेगावकर, अनुराधा मराठे हे गायक भावगीतांचा हा प्रवास गाण्यांच्या माध्यमातून उलगडणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन धनश्री लेले यांचे आहे.  ‘शुक्रतारा’ला इतकी वर्षे ज्या वादकांनी, निवेदकांनी, सहगायकांनी आणि तंत्रज्ञानी सहकार्य केले, त्या सर्वाचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.