पुरोगामी महाराष्ट्रात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आता तो देशपातळीवर साजरा झाला पाहिजे. यासाठी नागपूरकरांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्षभर पत्र लिहण्याच्या मोहिमेला संविधानदिनापासून सुरुवात करण्यात आली.
‘प्रयास’ या विद्यार्थी संघटनेने संविधान दिनाचे औचित्य साधून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी एक पत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. संविधान दिन राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यासंदर्भात पंतप्रधानांना आवाहन या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. याशिवाय जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर, संघटना, संस्था, गटाने किंवा संघटना, संस्थेच्या लेटरहेडवर पंतप्रधानांना पत्र लिहून संविधान दिन साजरा करण्याची विनंती करावी, असे आवाहन जनजागृती मोहिमेत करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी शिक्षक दिनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका बालकाने मी पंतप्रधान होऊ शकतो काय, असा प्रश्न मोदींना विचारला होता. संविधानाने प्रत्येक बालकाला पंतप्रधान होण्याचा अधिकार दिला आहे. मी पंतप्रधान झालो. तुम्ही देखील होऊ शकता, असे उत्तर त्यावर पंतप्रधानांनी दिले होते.
या पाश्र्वभूमीवर संविधान फाऊंडेशनने पंतप्रधानांना आवाहन करणारे पत्र लिहिले. शिक्षक दिनी बालकांशी संवाद साधले. महात्मा गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी एकात्मता दौडचे आयोजन केले. देशाच्या पंतप्रधानांनी अशाप्रकारच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणे अत्यंत प्रशंसनीय आहे. आता पंतप्रधानांनी ज्या संविधानाची शपथ घेऊन ते पंतप्रधान झाले. त्या संविधानाचा उत्सव साजरा करण्यासाठी पावले टाकावी. पंतप्रधानांनी संविधान दिनी जनतेशी, प्रशासनिक अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, असे पत्रातून आवाहन करण्यात आले. या धर्तीवर आता देशभरातून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याच्या मोहिमेला संविधान दिनी नागपुरातून प्रारंभ झाला असून, प्रत्येकाने एकतरी पत्र पंतप्रधानांना लिहावे, अशी जनजागृती करण्यात येत आहे.
‘प्रयास’ या विद्यार्थी संघटनेने आज संविधान चौकातून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम प्रजासत्ताक दिनापर्यंत सुरू राहणार आहे. लोकांच्या स्वाक्षरीचे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहेत. संविधान चौकात आज नागपूर विद्यापीठाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला. गीत गायन, संविधानावर चर्चा आणि काव्य वाचन आदी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले.