प्रशासनाने पंचवटी ग्रामस्थांशी कोणताही विचारविनीमय न करता पारंपरिक शाही मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची तक्रार करत जुन्या पारंपरिक मार्गावर सुव्यवस्था केल्यास कोणताही अनर्थ घडणार नाही. यामुळे सिंहस्थासाठी जुन्या शाही मार्गाचा विचार करावा अशी मागणी सिंहस्थ ग्रामउत्सव समितीने केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ साधु-संतासाठी नसुन पंचवटीसह नाशिक तीर्थ क्षेत्रात राहणाऱ्या भक्त परिवाराचाही आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक विचार न केल्यास आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे.

या बाबतचे निवेदन मंगळवारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. मागील शाही स्नानानंतर झालेला अपघात ही दुखद घटना होती. परंतु तो अपघात अपयशी व्यवस्थेमुळे झाला होता. त्यास प्रशासन जबाबदार होते. परंतु अशा अपघाताचे कारण दाखवून धार्मिक परंपरा, रुढी बदलणे व भाविकांच्या भावना दुर्लक्षिणे योग्य नसुन प्रशासनाचा निर्णय चुकलेला आहे. कारण नवीन शाही मार्ग जुन्या शाही मार्गापेक्षा अर्धा ते पाऊन किलोमीटर लांब आहे. नवीन शाही मार्गामधील गणेश वाडीतील तीळेश्वर गणपती मंदिराच्या पायऱ्यांपासुन मुंजोबा पारापर्यंतचा जवळपास २०० मीटर रस्ता हा तेवढात अरूंद आहे. तसाच जुन्या शाही मार्गातील सरदार चौक ते काळाराम मंदिर पर्यंतचा रस्ता आहे. नवीन शाही मार्ग हा गाडगे महाराज पुलाखालून जातो, पुलाची रुंदी जवळपास १८ फूट आहे. आखाडय़ांचे मानाचे शाही ध्वज २० ते २५ फुटाचे असतात. मग शाही ध्वज कसे जाणार याचा विचार केला गेला नाही, याकडे समितीने लक्ष वेधले. नवीन शाही मार्ग हा म्हसोबा पटांगण म्हणजे गाडगे महाराज पूल परिसरात संपुर्ण नदीपात्रात आहे. सरदार चौक देवी मंदिर जवळील रस्त्यांच्या उंची पेक्षा गाडगे महाराज पुलाजवळच्या रस्त्याची उंची जवळपास तीन फुटांनी खाली आहे. शाही स्नानांचे दिवस भर पावसाळ्यात आहेत. नदीला थोडासा जरी पूर आला तरी या ठिकाणी पाणी राहील आणि त्यावरून शाही मिरवणूक कशी जाईल या विषयी कुठलाच विचार करण्यात आलेला नाही. गाडगे महाराज पुलाजवळ वाघाडी नदी गोदावरीला मिळते. गोदावरीस पूर असो वा नसो, वाघाडी नदीच्या उगम जागेवर अर्धा तास जरी जोरात पाऊस झाला तरी वाघाडी नदीला पूर येतो. अशी घटना मिरवणूक सुरू असतांना झाली तर काय होईल अथवा रात्री पूर येऊन गेला तर शाही मार्गावरील चिखल आणि घाण कसा काढणार, असा प्रश्न समितीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
प्रशासनाने चेंगराचेंगरीचे कारण देऊन शाही मार्गात बदल केला. मात्र त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. कारण सरदार चौकाकडे जाण्यासाठी रामसेतु पुल, देवीमंदिर व सरदार चौक अशा तीन कमी विस्तारीत रस्त्यावर बॅरीकेट टाकून जनसागर आडवता येणे शक्य आहे. नवीन मार्गाप्रमाणे आता स्मशानभूमी मार्ग, रोकडोबा पटांगण, म्हसोबा पटांगण अशा विशाल एकदम मोकळ्या परिसरात लोखंडी जाळ्या उभारणे आणि ते टिकवून ठेवणे कठीण आहे.
नवीन शाही मार्गाव्यतिरिक्त जुना शाहीमार्ग व पंचवटी गावठाणातील गोदावरीकडे येणारे रस्ते दुर्लक्षित होतील. परंतु त्या रस्त्यांवरील गर्दी मात्र कमी होणार नाही. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता आहे. उलट याच परिसरात मार्ग निश्चित करून दोन दोन ठिकाणी पोलीस व प्रशासन बळ खर्ची घालण्याचे कारण काय, असा प्रश्न समितीने केला आहे. प्रशासनाने नव्या शाही मार्गाबाबत गांभीर्याने पुनर्विचार करावा, याबाबत योग्य कारवाई न झाल्यास समितीच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.