सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, त्याप्रमाणे पालिकेसह शासकीय यंत्रणेच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. सिंहस्थाच्या नियोजनासाठी याआधी भरपूर कालावधी असताना त्यावेळी गंभीरपणे हा विषय हाताळण्याची गरज ना यंत्रणेला वाटली ना लोकप्रतिनिधींना. पालिकेतील सत्तेचे राजकारण, लोकसभा, विधानसभा निवडणूक यामध्येच सर्वजण गुग राहिले. त्या गुंगीतून हळूहळू एकेक जण बाहेर येऊ लागल्यावर  सिंहस्थाची बहुतेक कामे अद्याप बाकी असल्याचे त्यांच्या लक्षात येऊ लागले.  ‘रात्र थोडी सोंगं फार’ अशी अवस्था आता यंत्रणेची झाली आहे.
दर बारा वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासकीय यंत्रणा यांची परीक्षाच असते. बारा वर्षांपूर्वी चेंगराचेंगरीमुळे घडलेल्या दुर्घटनेचा अपवाद वगळता कुंभमेळा चांगलाच यशस्वी झाला होता. त्याचे बहुतांश श्रेय तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याकडे जाते. सिंहस्थाच्या कामांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दिलेले लक्ष, प्रशासनाकडून काम करून घेण्याची पध्दत आणि अभ्यासपूर्वक नियोजन यामुळे सिंहस्थ चांगलाच गाजला. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थाची तारीख हळूहळू जवळ येत असताना यंत्रणा खडबडून जागी होऊ लागली असून सुमारे सहा महिन्यांपासून प्रभारी आयुक्तपदाच्या रिगणात घुटमळणारे निर्णय गेडाम यांच्यासारखा आशादायक आयुक्त मिळाल्याने मार्गी लागू लागले आहेत. परंतु निर्णयांचे आणि कामाचे साचलेपण इतक्या मोठय़ा प्रमाणात आहे की गेडाम यांच्यासाठी सिंहस्थ म्हणजे एक आव्हान ठरावे. हे लक्षात घेऊन गेडाम यांनी कारभार हाती घेतलेल्या क्षणापासून सिंहस्थाच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोणती कामे बाकी आहेत, कोणत्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे, कोणत्या कामांसाठी किती निधी मिळणार आहे, किती उपलब्ध आहे, या सर्व प्रश्नांचा चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न गेडाम यांच्याकडून करण्यात येऊ लागला आहे.
विशेष म्हणजे सिंहस्थ कामांचा प्राधान्याने विचार करतानाच आयुक्तांना इतर नेहमीच्या कामांचाही निपटारा करावा लागणार आहे. सिंहस्थाचे शिवधनुष्य उचलणे ही कुणा एकाची जबाबदारी नसून प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी यांनी हातात हात घालून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु अजूनही तसे अपवादानेच दिसत आहे. त्यातच जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याने समस्यांमध्ये भरच पडणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या पातळीवर सिंहस्थाची तयारी अधिक जोरात सुरू असल्याचे दिसते. आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी सिहंस्थातील सुरक्षा व्यवस्था यावर संपूर्ण लक्ष दिले आहे. सिंहस्थासंदर्भातील जागांवर स्वत: जात त्यांनी अभ्यास सुरू केला आहे. सरंगल यांचा हा गंभीरपणा निश्चितच कौतुकास्पद असला तरी त्यामुळे सद्यस्थितीतील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून त्यांचे आयुक्त म्हणून असलेले लक्ष काहीसे उडाल्याचे दिसून येत आहे. शहरात काही दिवसांपासून वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता आयुक्तांनी भविष्यापेक्षा वर्तमानकाळाविषयीही अधिक गंभीर राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नाशिककरांना पूर्वीच्या सरंगलांचे दर्शन अभिप्रेत आहे.