सिंहस्थात कोणत्या कोणत्या प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार होत असल्याचे लक्षात घेऊन अभिनव भारत संघटनेने या काळात स्वातंत्रवीर सावरकरांचे अंधश्रद्धेला विरोध असणारे विचार भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी अभिनव भारत येथे सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. या वेळी सिंहस्थ काळात उपरोक्त उपक्रम राबविण्याचे निश्चित झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे सावरकर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भगूर येथील सावरकर स्मारकात सकाळी बागेश्रीनिर्मित ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले. शहरातील अभिनव भारत मंदिरात सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक शाहू खैरे, मंदिराचे प्रमुख सूर्यकांत रहाळकर, प्रा. गिरीश पिंपळे, नंदन रहाणे आदी उपस्थित होते. भगूर येथील स्मारक आणि अभिनव भारत मंदिरात दिवसभर सावरकरप्रेमींची गर्दी झाली होती.
मंदिरात अभिवादन कार्यक्रम झाल्यावर सिंहस्थ कुंभमेळ्यातील उपक्रमांविषयी चर्चा झाली. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये लाखो भाविक दाखल होणार आहेत. या काळात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार घडू शकतात.
सावरकरांचा अंधश्रद्धेला विरोध होता. रूढी, परंपरा, व्रत-वैकल्ये, सुतक आदींचे पालन करण्याची गरज नाही. मंत्रबळ नव्हे तर, यंत्रबळाचा स्वीकार करावा असे त्यांचे आधुनिक विचार होते. ज्योतिषशास्त्रावरही त्यांचा विश्वास नव्हता.
सावरकरांनी आपल्या मृत्युपत्रात देह विद्युतदाहिनीत दहन करावा, काकस्पर्श, पिंडदान असे विधी करू नयेत, मृत्यूनंतर बाजारपेठा व दुकाने बंद ठेवू नयेत, कारण त्यामुळे नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास अडचणींचा सामना करावा लागतो असे म्हटले होते. ‘आपण समद्रात उडी मारली ही गोष्ट तुम्ही विसरात तरी चालेल, पण आपले सामाजिक विचार विसरू नका’ हा सावरकरांचा आग्रह होता. त्यांचे अंधश्रद्धाविरोधी विचार सिंहस्थातील भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प अभिनव भारतने केला असल्याचे रहाळकर यांनी सांगितले. शाही पर्वणी व गर्दीच्या काळात सावरकरांच्या विचारांची पत्रके वितरित केली जाणार आहे.
सिंहस्थात देशभरातून लाखो साधू नाशिक व त्र्यंबकनगरीत दाखल होणार आहेत. या वेळी श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेची दुकाने मांडली जाण्याचा धोका आहे. या माध्यमातून भाविकांची जनजागृती केली जाणार आहे.