परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून गोरगरीब कॅन्सर रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांना राहण्यासाठी हक्काचे ठिकाण आहे ते दादर येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट. पाच मजली धर्मशाळेत दररोज सुमारे सहाशे रुग्ण व त्यांचे नातेवाईक कायम वास्तव्याला असतात. रुग्णांना राहण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळे आणखी दोन मजले बांधण्यासाठी ट्रस्टने पालिकेकडे अर्ज केला तेव्हा जागे झालेल्या पालिकेच्या मालमत्ता विभागाने १९८५ पासून तुमची थकबाकी असून त्यावर १८ टक्के व्याज द्या, अशी मागणी केली तेव्हा थक्क होण्याची वेळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर आली. रुग्णसेवा करणाऱ्या सामाजिक संस्थेची व्याजासाठी गेली दोन वर्षे अडवणूक सुरू होती. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना सोमवारी याची माहिती समजताच त्यांनी तात्काळ व्याज माफ केले जाईलच, शिवाय तुम्हाला हवी ती मदत दिली जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे ‘देव पावणे’ म्हणजे काय, त्याचा अनुभव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आला.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यांमधून परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळांमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे तत्कालीन मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी मुंबई तसेच राज्यातील पालिका आयुक्तांची बैठक घेऊन शासन व पालिकांच्या रुग्णालयातील मोकळ्या जागेत सामाजिक संस्थांच्या मदतीने धर्मशाळा बांधण्याचा धोरणात्मक निर्णयही घेतला होता. मुंबईमध्ये आज सर्व धर्मशाळांमध्ये मिळून अडीच हजार एवढेच बेड उपलब्ध आहेत. मुंबईत येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात गरिबांसाठी धर्मशाळा उभ्या राहणे आवश्यक आहे; तथापि लाल फितीच्या चक्रामुळे सामाजिक संस्था पुढे येण्यास कचरत आहेत. शासन व्यवस्थेतील ‘बाबू’लोकांमध्ये माणुसकीचा ओलावा जणू काही संपला आहे असा अनुभव सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना येत असताना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीचा हात आम्हाला सामाजिक कामाची ऊर्जा देऊन गेला, असे गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे प्रमुख अश्वि मेहता आणि नेमीनथ जैन फाऊंडेशनचे निरूप कोठारी यांनी सांगितले.
१९८५ पासून दादर येथील दादासाहेब फाळके मार्गावर पाच मजली गाडगेबाबा धर्मशाळा हजारो रुग्णांचे आश्रयस्थान बनले आहे. चारशे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय असताना दररोज सुमारे साडेसहाशे रुग्ण येथे राहत असतात. धर्मशाळेच्या मोकळ्या जागेत राहणाऱ्या या कॅन्सर रुग्णांना टाटा कॅन्सर रुग्णालयापर्यंत सोडण्यासाठी संस्थेने रुग्णवाहिकाही ठेवली आहे. येथे तीन महिन्यांपर्यंत रुग्णांना राहता येते. यासाठी अवघे पंधरा रुपये आकारले जातात, तर जेवणासाठी अवघे तीन रुपये घेतले जातात. ज्या रुग्णांना हे पैसेही देणे परवडत नाही त्यांची मोफत व्यवस्था संस्था करते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन चटईक्षेत्र उपलब्ध असल्यामुळे संस्थेने आणखी दोन मजले बांधण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे २००४ साली महापालिकेकडे रीतसर अर्ज केला त्या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोळा लाख रुपयांची थकबाकी अधिक १८ टक्के व्याजाचे अशी चाळीस लाख रुपयांची मागणी केली. संस्थेची गुजरातमध्येही रुग्णसेवेची सामाजिक कामे सुरू असल्यामुळे संस्थाचालकांनी पालिकेला दंडाची रक्कम माफ करा, थकबाकी देतो, असे पत्र देऊन पुढे फारसा पाठपुरावा केला नव्हता. मात्र २०१२ पासून पुन्हा पालिकेकडे रुग्णांची गरज लक्षात घेऊन पाठपुरावा केला तेव्हा मालमत्ता विभाग व अन्य विभागांनी आधी थकबाकी व व्याजाची रक्कम भरण्याचा तगादा लावला. दोन मजले बांधण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च असून रुग्णांच्या निवास व भोजनाचा खर्च सेवाभावाने करणार असताना पालिकेने साळा लाखांची थकबाकी घ्यावी, परंतु व्याज माफ करावे एवढीच प्रार्थना केली. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना ही माहिती समजताच त्यांनी व्याज माफ करण्याची भूमिका घेऊन सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन संस्थाचालकांना दिले.