पिकते तिथे विकत नाही आणि विकले तरी त्याला फारसा भाव मिळत नाही. आपल्याकडच्या नागपूरमध्ये पिकणाऱ्या लिंबू टिंबू संत्र्यांना बाजारात फारशी किंमत नसली तरी चीनमधून सुरेख वेष्टनात आलेल्या छोटय़ा संत्र्यांना मुंबईत मात्र चांगला भाव मिळत आहे. सध्या तुर्भे येथील घाऊक फळबाजारात चीनवरून आलेली ही लिंबू-टिंबू संत्री चक्क एक हजार ४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहेत. दिल्ली येथील श्रीराम महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पॅकेजिंगवर भारतीय मालाची विक्री अवलंबून आहे असे सांगितले होते. या पूर्वीही अनेक  तज्ज्ञांच्या मते ‘चमकते ते सोने’ असे भारतीय मनावर बिंबवण्याच्या अनेकवेळा प्रयत्न केला गेला पण त्याचा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. चीनने या प्रकारात कशी बाजी मारली आहे ते फळबाजारात फेरफटका मारल्यानंतर लक्षात येते. तुर्भे येथील फळ बाजारात या पॅकेजिंगचा प्रत्यय सातत्याने येत आहे. जम्मू कश्मीर, हिमाचलमधून आलेल्या चवदार, रसाळ, सफरचंदाला कदाचित जास्त भाव मिळणार नाही, पण हेच सफरचंद ऑस्ट्रेलिया, चीन येथून आल्यास त्याला चांगला भाव दिला जातो. या फळांना खरेदी करणारे उच्चभ्रू असल्याने त्या साठी जास्त घासाघीस करावी लागत नाही असे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले. हीच स्थिती इतर फळांचीही आहे, पण या सर्व फळांमध्ये सध्या चिनी संत्र्यांनी चांगलीच बाजी मारली असल्याचे दिसून येते. संत्र्याची राजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये बागायतदार जी लहान संत्री निकृष्ट म्हणून फेकून देतात तीच संत्री चीनमधून जाळीच्या पिशवीत पॅक करुन आली की, येथे चिनी संत्री म्हणून विकली जात आहे. सर्वसाधारणपणे या संत्र्यांना लहान मुले जास्त पसंत करतात. त्यामुळे मलबार हिलसारख्या श्रीमंतांच्या वस्त्यांमध्ये या संत्र्यांना मोठी मागणी असून तिचा दर ८०० ते १४०० रुपये प्रति किलो असा आहे. लहान आणि चांगल्या वेष्टनामुळे हे फळ हातोहात संपत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका आंबा व्यापाऱ्याने असाच प्रयोग केला होता असे व्यापारी सांगतात. हापूस आंब्याच्या खाली पडणाऱ्या लहान कैऱ्या अशाच प्रकारे जाळी मध्ये पॅक करून बाजारात विकल्या होत्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालेला होता. त्यामुळे ‘चमकते तेच सोने’ असे म्हणतात, तेच खरे असे या फळाकंडे बघून म्हटले जात आहे.