घटना पहिली – ठाण्यात रिक्षात बसलेल्या एका मुलीला रिक्षावाला वेगळ्याच वाटेने नेत असल्याचा संशय येतो. ती रिक्षावाल्याला रिक्षा थांबवण्यास सांगते. मात्र तो तशीच जोरात चालवतो. मुलगी चालत्या रिक्षातून खाली उडी मारते. मागून येणारे दोन बाइकस्वार त्या मुलीला मारहाण करून पळ काढतात. मुलगी कोमात जाते. सुदैवाने पुन्हा प्रकृती स्थिर होते..

घटना दुसरी – स्थळ, पुन्हा एकदा ठाणेच! भिवंडीला जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या दोन मुलींना रिक्षावाल्याचे हावभाव ठीक वाटत नाहीत. तो रिक्षाचालक त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करत असल्याचे पाहून त्या दोघी धावत्या रिक्षातून उडी मारतात. सुदैवाने दोघींनाही किरकोळ दुखापत होते.
घटना तिसरी – मुंबईतील एका उपनगरात रिक्षाचालक एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करतो.
या तीनही घटनांमध्ये अनेक समान धागे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तिन्ही घटना रिक्षाशी संबंधित आहेत. तिन्ही घटनांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न किंवा उद्देश आहे. यातील पहिल्या घटनेनंतर सतर्क होत ठाणे वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली खरी, मात्र ही योजना अद्याप तरी ठाण्यापुरतीच मर्यादित आहे. ही योजना मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी लागू करून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित का केला जात नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर विविध स्तरांवर वेगवेगळे असल्याने, खरेच प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी वाहतूक व परिवहन विभाग म्हणजे पर्यायाने सरकारला आहे का, असा प्रश्न पडला आहे. ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांसाठी एक स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे रिक्षाचालकाच्या मागे प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने एक कार्ड लावण्यात येणार होते. या कार्डवर रिक्षाचालकाचा क्रमांक, त्याचे नाव, रिक्षाचा क्रमांक, नोंदणी क्रमांक आणि वाहतूक पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक छापला आहे. एकटीदुकटी महिला प्रवासी एखाद्या रिक्षात बसल्यास त्या महिलेने केवळ या स्मार्ट कार्डचा फोटो घेऊन तो पाठवायचा आहे. त्यानंतर तिला तातडीने मदत मिळेल, असे ठाण्याच्या वाहतूक पोलीस प्रमुख रश्मी करंदीकर यांनी सांगितले होते. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी एक अ‍ॅपही तयार केले होते.हे अ‍ॅप आणि स्मार्ट कार्ड योजना केवळ ठाण्यापुरती मर्यादित न ठेवता तिचा व्याप मुंबईतही वाढवावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षा टॅक्सी यांमध्ये जीपीएसप्रणाली बसवण्याचा विचारही सरकारी पातळीवर होत आहे. ही जीपीएसप्रणाली येईपर्यंत तरी हे स्मार्ट कार्ड बसवावे, असे प्रवाशांचे मत आहे. त्यामुळे किमान रिक्षा वा टॅक्सीचालकाला थोडी तरी जरब बसेल व महिलांचा प्रवास सुरक्षित होईल, असे काही प्रवाशांनी सांगितले.

तक्रार आहे? संपर्क साधा..
प्रादेशिक परिवहन कार्यालय – १८००-२२-०११०
वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष झ्र् २४९३७७५५