एके काळी केवळ फोन घेणे आणि करणे हे काम करणारा मोबाइल अल्पावधीतच आपला स्मार्ट मित्र बनला. हे मोबाइलशी असलेले मैत्रीचे नाते अधिक स्मार्ट करण्यासाठी विविध स्तरांवर संशोधन सुरू आहे. याच संशोधनाचा एक भाग म्हणजे आपला मोबाइलमध्ये मानवी संवेदनांचा समावेश करणे हा आहे. याच विषयावर भारतीय वंशाचा अल्बामा विद्यापीठातील विद्यार्थी नितेश सक्सेना याने अभ्यास करून आनोखी चीप शोधून काढली आहे.
नितेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शोधून काढलेली चीप  मोबाइल वापरकर्त्यांला अधिक स्मार्ट बनविण्याच्या दृष्टीने मदत करणार आहे. जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित ही चीप वापरकर्त्यांचा चेहरा ओळखू शकणार आहे. याचबरोबर त्याच्या खासगी माहितीची गोपनियताही राखण्यास मदत करणार आहे. सध्या मोबाइलवरून आर्थिक व्यवहार करण्याकडे मोठा कल आहे. पण यात अनेकदा सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. मात्र या चीपच्या मदतीने आपण हे व्यवहार अगदी सुरक्षित करू शकतो. चीपमध्ये देण्यात आलेल्या चेहरा ओळख तंत्रज्ञानामुळे आपला चेहरा दिसला नाही तर एकही पासवर्ड खुला होणार नाही. यामुळे जरी आपला मोबाइल चोरीला गेला आणि चोराने पासवर्ड मिळवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो मिळू शकणार नाही. कारण तीन वेळा जर चेहरा चुकीचा आला तर या चीपच्या मदतीने तुमचे सर्व पासवर्ड डिलिट होऊन जातात. याचबरोबर यामध्ये विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने मोबाइलला आपण मालकाच्या हातात नसून दुसऱ्या कुणाच्या हातात आहे हे समजते आणि मोबाइल लॉक होतो. जेणेकरून अनोळखी व्यक्ती आपला फोन सुरूच करू शकणार नाही. याशिवाय ही चीप आपला मूड ओळखून आपल्याला मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्सपैकी किंवा गाण्यांपैकी कोणती गाणी त्यावेळेस ऐकावी किंवा कोणते अ‍ॅप्स वापरावे हे सुचवू शकते. विद्यापीठाच्या स्पाय प्रयोगशाळेत नितेशने हे संशोधनाचे काम पूर्ण केले आहे. ही प्रणाली आपण वापरत असलेल्या विविध कंपन्यांची सर्व उपकरणे एकाच उपकरणावरून नियंत्रण करण्याची मुभा देत असल्याचे नितेश सांगतो. याशिवाय यामध्ये ब्लूप्रॉक्सिमिटी नावाचे एक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये आपण वापरत असलेली सर्व उपकरणे एकदा जोडली की आपण आपला मोबाइल घेऊन त्या उपकरणांच्या जवळ जाऊ तेव्हा ती उपकरणे आपोआप सुरू होतील. म्हणजे घरी गेल्यावर लॅपटॉपवर काम करायचे असेल तर आपण या अ‍ॅपवर लॅपटॉपला सूचना दिल्यानंतर ज्यावेळेस आपण घराजवळ येतो तेव्हा लॅपटॉप सुरू होतो. म्हणजे आपण घरी पोहचून थेट सुरू लॅपटॉपसमोर बसू शकतो. यासाठी केवळ लॅपटॉप हा शटडाऊन ऐवजी लॉक असणे आवश्यक असणार आहे.
नीरज पंडित, मुंबई