सापांचे प्रदर्शन, सापांची वाहतूक आणि विषाची तस्करी करून वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या पारध्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाकडून सापांच्या पारध्यांवर संनियंत्रण आणण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली. मात्र, अजूनही राज्यात हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर सुरूच असल्याने या समितीद्वारे तयार होणारा कृती आराखडा या प्रकारांना आळा घालण्यास सक्षम ठरणार का? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका क्र. ८६४५/२०१३ सह जनहित याचिका क्र. ७५/२०११ मध्ये दिलेल्या १५ जुलै २०१४च्या आदेशानुसार वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या प्रभावी अंमबजावणीच्या दृष्टीने नागपंचमी तसेच तत्सम उपक्रमांच्या कालावधीत सापांच्या पारध्यांवर संनियंत्रण करण्यासाठी राज्य कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली. ही समिती आता कृती आराखडा तयार करणार आहे. हा कृती आराखडा तयार झाल्यानंतर कदाचित सापांच्या प्रदर्शन, वाहतूक आणि विष तस्करीवर थोडेफार नियंत्रणही येईल.
मात्र, फेसबुक या सोशल मीडियावरून होणाऱ्या सापांच्या प्रदर्शनाला आळा घालण्याचे मोठे आव्हान या समितीपुढे कृती आराखडा तयार करताना असणार आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे नागपंचमीच्या दोन दिवस आधीच नागांना पकडून त्याची पूजा केल्याचे उघडकीस आले. फेसबुकवर त्याचे छायाचित्र आले. याचा उपयोग कायद्याच्या उल्लंघनाचा पुरावा म्हणून करता येऊ शकतो. सायबर क्राईम अ‍ॅक्टच्या मदतीने वन्यजीव संरक्षण अधिनियमाचा भंग केल्यावरून संबंधितांविरुद्ध कारवाईसुद्धा करता येऊ शकते.
मात्र, अजूनही वनखात्याने त्यावर कारवाई केलेली नाही. ज्या ज्या मंडळाने यापूर्वी नागपंचमीसाठी साप पकडले त्यापैकी फक्त काहींविरुद्धच वनखात्याने फौजदारी स्वरुपाची प्रकरणे दाखल केली आहेत. प्रत्यक्षात या प्रकरणातील आवश्यक पुरावे व कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत.
अशा प्रलंबित प्रकरणांची दखल घेऊन लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी कार्यक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. कागदोपत्री अशी प्रकरणे दाखल राहिल्यास गैरकृत्ये करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
अलीकडे साप पकडण्याची थोडीफार माहिती असलेले स्वयंघोषित सर्पमित्र मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यांच्याकडे विविध जातीचे साप, सापांचे विष आणि अवयव असतात. त्यांचे हे कृत्य वर्षभर सुरू असते. त्यामुळे त्यांच्यावर छापा घालून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.
समितीची शनिवारी बैठक
सापांचे प्रदर्शन, वाहतूक आणि विष तस्करीवर संनियंत्रण आणण्यासाठी गठीत समितीची दुसरी बैठक येत्या शनिवार, २९ नोव्हेंबरला प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या (वन्यजीव) दालनात आयोजित करण्यात आली आहे.