साधारणत: ९०च्या दशकात मोबाइल हातात आले. यानंतर मोबाइल तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत राहिले आणि मोबाइल फोनबरोबरच इतर गोष्टींसाठीही उपयुक्त ठरू लागला. १९९७ मध्ये नोकिया कंपनीच्या अभियंत्यांनी ६११० या फोनमध्ये सापाचा गेम उपलब्ध करून देऊन मोबाइलमधील गेम्सच्या पर्वाला सुरुवात करून दिली. हाच सापाचा गेम स्मार्टफोनच्या बाजारात हरवून गेला. त्याला तब्बल १५ वर्षांहून अधिक काळानंतर स्मार्टफोनवर जागा मिळणार आहे. १४ मे रोजी हा गेम स्मार्टफोनवर उपलब्ध होणार आहे.
नोकिया मोबाइलमध्ये सापाचा गेम आला अणि त्याला सुरुवातीला खूप टीकेचे धनी व्हावे लागले. हा गेम म्हणजे वेळ वाया घालविण्याचा प्रकार असल्याचे इथपासून ते गेममुळे मानसिक आजार होतात इथपर्यंतचे आरोप-प्रत्यारोप झाले. पण कालांतराने हा गेम अनेकांच्या पसंतीस उतरला आणि विरोधानंतरही त्याने अनेक वर्षे तग धरला. यानंतर स्मार्टफोनचा उदय झाला आणि साधे फोन हळूहळू कालबाहय़ होऊ लागले. त्याचबरोबर त्यातील गेम्सही कालबाहय़ झाले.
यातच सापाचा खेळही हद्दपार झाला. त्याची जागा स्मार्टफोनवरील अँग्री बर्ड्स, कॅण्डी क्रश, सब-वे सर्फर अशा गेम्सनी घेतली. आता पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सापाचा गेम स्मार्टफोनवर येणार आहे. रुमिलस डिझाइन आणि तान्ली अरमांटो या गेम विकासकांनी हा गेम विकसित केला असून तो १४ मे रोजी स्मार्टफोनवर अवतरणार आहे. या नवीन गेममध्ये खूप रंगसंगती आणि वेगवेगळय़ा पातळय़ा आणल्या असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. याशिवाय या गेममध्ये रिवाइंडचा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायामुळे आपण संपूर्ण खेळ संपल्यावर पुन्हा तो खेळू शकतो. हा गेम एकाच वेळी आयओएस, अ‍ॅण्ड्रॉइड आणि विंडोज या तिन्ही ऑपरेटिंग प्रणालीवर चालणार आहे. यामुळे पुन्हा एकदा फोनवर सापाचा गेम दिसू लागणार
आहे.