स्त्रियांवरील वाढते  अत्याचारांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलमेंट प्रोग्रॅम आणि महिला फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने  डोंबिवलीतील पेंढरकर, कल्याण येथील बिर्ला तसेच अंबरनाथ येथील कारखानीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ठाणे-बदलापूर परिसरात ‘छेडछाड क्यू’ या पथनाटय़ाचे आठ प्रयोग केले. मंजुळ भारद्वाज यांनी लिहिलेली ही संहिता भर रस्त्यात, चौकात लोकांसमोर सादर करताना मिळालेली अनुभवाची शिदोरी मोलाची होती, असे कारखानीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले. आता  हेच पथनाटय़ महाविद्यालयातील विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये सादर करणार आहेत.
महिला फेडरेशनच्या गीता महाजन, महाविद्यालयातील प्रा. सुनीता कुलकर्णी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रत्यक्ष पथनाटय़ सादर करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना बदलापूर येथील तीनदिवसीय शिबिरात नाटय़विषयक मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले.