रसिकांच्या मनातील प्रक्रियेचा लेखकाने शोध घेतला पाहिजे आणि आपल्या अभिव्यक्तीतून समाजाच्या बऱ्यावाईट घटनांचे प्रतिबिंब आपल्या लेखनातून मांडले पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे आयोजित ‘सृजनशीलता व नाटक’ कार्यशाळेच्या समारोपात कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत झाली. दत्ता पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. लहानपणी गणेशोत्सवात होणाऱ्या नाटकांच्या कुतूहलापोटी नाटकाचे वेड मनात शिरले आणि त्यातून नाटकातून काही तरी मांडता येते ही जाणीव मनात रुजली. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना महाविद्यालयीन स्पर्धामधून आत्मविश्वास मिळाला. नवनवीन संहिता शोधून प्रयोग केले. विजय तेंडुलकरांचे ‘कोवळी उन्हे’ या स्तंभलेखाचे नाटय़रूपांतर केले. याच काळात लंडनच्या रॉयल कोर्ट थिएटरतर्फे नवनाटककारांसाठी असलेल्या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. जागतिक रंगभूमी लेखकासाठी किती महत्त्वाची आहे याचा त्यामुळे प्रत्यय आला. युवा कलावंतांनी मुंबई व पुण्याच्या ग्लॅमरस दुनियेचे आकर्षण न बाळगता आपल्यातील सत्त्व बाहेर काढावे, आविष्कारात सातत्य ठेवावे, प्रेक्षकांची अभिरुची घडविण्यासाठी प्रयत्न करावा, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान शिबिरार्थीना प्रमाणपत्राचे वाटप पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. मधुरा दिवाण, प्रवीण काळोखे या वेळी उपस्थित होते.