स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजकारण करणे हेच खरे राजकारण आहे. या पद्धतीने भरीव असे काम केल्यास मत मागण्यांसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही. उलट मतदार तुमच्याकडे आकर्षित होतील. नागपूरमध्ये सेवाभावी संस्थांच्या कामातून ते आपण सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले. वेगवेगळ्या आरोपांमुळे ‘पूर्ती ट्रस्ट’च्या अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या चौकशीच्या कचाटय़ात सापडल्या असताना दुसरीकडे याच कंपन्यांमार्फत दहा हजार युवकांना रोजगार मिळवून दिल्याचे सांगत गडकरी यांनी सेवाभावी संस्थांच्या आधारावर आपले राजकारण आधारित असल्याचा दावा केला.
सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे आयोजित आदिवासी महिला मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. आशिष शेलार, परिसर सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबा पाटील, धुळे महापौर मंजुळा गावित, आ. उमाजी बोरसे, माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस सीमा हिरे आदी उपस्थित होते. मेळाव्यास महिलांसह आदिवासींची लक्षणीय उपस्थिती होती. प्रारंभी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडापटू योगिता गवळी हिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पूर्ती ट्रस्टच्यावतीने यावेळी आदिवासी महिलांना शिलाई यंत्र व तत्सम साहित्याचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात राजकीय विषयावर बोलणे टाळणाऱ्या गडकरी यांनी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राजकारणाचे इप्सित कसे साध्य करता येते, याचे दाखले दिले. त्यात प्रामुख्याने पूर्ती ट्रस्टच्या कंपन्यांद्वारे विदर्भाची विकास प्रक्रिया कशी गतिमान झाली, यावर त्यांचा प्रामुख्याने भर राहिला. पूर्ती ट्रस्टमार्फत ऊर्जा, शिक्षण आदी क्षेत्रात लक्षणीय काम केले जात आहे. यामुळे नागपूर विकसित झाले. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असे काम सर्वत्र झाल्यास सर्वसामान्यांना सरकारची गरज पडणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे कोणत्याही राजकीय पक्षाशी युद्ध नाही. गरिबी, बेरोजगारी व भ्रष्टाचारातून देशाला मुक्त करणे हाच आता भाजपचा निर्धार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेगळा आगाम प्राप्त करून दिला जाऊ शकतो. बचत गटांमार्फत मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती साधता येऊ शकते. पूर्ती ट्रस्टने या तीन बाबींवर कटाक्ष ठेवून अनेक क्षेत्रात उद्योगांची उभारणी केली. त्या माध्यमातून हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे नागपूरचा विकास शक्य झाला.
सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवी संस्थेमार्फत आदिवासी क्षेत्रात वेगवेगळ्या उपक्रमांची स्थापना करता येईल. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले. संपूर्ण भाषणाचा रोख गडकरी यांनी पूर्ती ट्रस्टमार्फत साधलेली प्रगती, यावर ठेवला.