उरण तालुक्यात विकासाच्या नावाने अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मातीच्या भरावासाठी यापूर्वीच अनेक डोंगर भुईसपाट करण्यात आलेले असून सध्या वन विभागाच्या अखत्यारीतील डोंगरदेखील पोखरले जात असून दररोज शेकडो ब्रास माती काढली जात आहे. याकडे वन विभागातील अधिकाऱ्यांकडून हेतूपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. मात्र वन विभागाच्या निदर्शनास अशी कोणतीही बाब आलेली नसल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे.
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील चिरनेर तसेच जासई परिसरात मोठय़ा प्रमाणात डोंगरातून भरावासाठी माती काढली जात आहे. अनेक ठिकाणी खासगी जमिनी असून या जमिनीला लागूनच शेजारीच वन विभागाच्याही जमिनी आहेत. मात्र हद्द कोणाची कुठे याची खात्री नाही त्यामुळे आपल्या जमिनीव्यतिरिक्त वन जमिनीतील माती काढून आपल्या भागात ओढली जात आहे. खासगी जमिनीतील माती म्हणून तिची विक्री केली जात असल्याचेही प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. द्रोणागिरी डोंगरातून अशा प्रकारच्या वन विभागाच्या जमिनीतील माती यापूर्वी चोरण्यात आलेली होती. एकीकडे वन संरक्षणासाठी वृक्ष लागवडीच्या मोहिमा वन विभागाकडून राबविल्या जात असताना संरक्षित वन व डोंगर पोखरले जात असल्याने पर्यावरण ऱ्हासात भरच पडणार असल्याचे मत चिरनेर येथील निसर्गप्रेमी जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात उरण वन संरक्षण विभागाचे वन संरक्षक चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता वन जमिनीच्या देखरेखीसाठी आमचे वन संरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्या निदर्शनास अशी कोणतीही घटना आलेली नाही. मात्र जर नागरिकांना अशा प्रकारची वन विभागातून माती काढली जात असल्याची शंका असल्यास त्यांनी आम्हाला जागेची माहिती दिल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.