महाराष्ट्र राज्यस्थापनेनंतर ‘बॉम्बे’ नावाच्या बहुसांस्कृतिक शहरातील कलासंस्कृती बहरली ती ‘जहाँगीर आर्ट गॅलरी’च्या साथीने. साहजिकच या उच्चभ्रू कलाकार-रसिकांना बैठकीचा अड्डा हवा होता.. ती गरज भागवली या ‘आर्ट गॅलरी’तच आडोशाला थाटलेल्या ‘कॅफे समोवर’ने. १९६०-७० च्या दशकात मुंबईतील चित्रकारांबरोबरच लेखक-समांतर सिनेमावाल्यांना हक्काची जागा देणारे हे रेस्टॉरंट आता इतिहासजमा होत आहे. ‘आर्ट गॅलरी’च्या विस्तारात अडथळा ठरत असल्याची न्यायालयीन लढाई हरल्यानंतर आता या मार्चअखेरीस ‘बॉम्बे कल्चर’चा हा कोपरा अस्तंगत होत आहे. ‘चहा-पकोडा’चा आस्वाद घेत ३१ मार्चला या रेस्टॉरंटला निरोप देण्यात येईल.
‘कॅफे समोवर’ आता बंद पडणार अशी वेळ यंदा काही प्रथमच आली नाही. यापूर्वीही आता बंद पडणार म्हणता म्हणता हे रेस्टॉरंट सुरू राहिले. गेल्या अनेक वर्षांत कलावंतांऐवजी वकीलमंडळांचाच जास्त राबता असायचा. गेल्या १५ वर्षांत ‘कॅफे समोवर’ला कलावर्तुळात असलेले वलय तसे कमी झाले होते. पण आता खरोखरच बंद पडणार अशी वार्ता सर्वतोपरी पसरल्याने ‘समोवर’च्या जुन्या ग्राहकांचा, नामांकित मंडळींचा राबता वाढला आहे.
प्रीतीश नंदी, सिद्धार्थ भाटिया येऊन गेले. सोमवारी शोभा डे यांनी दुपारच्या जेवणासाठी ‘समोवर’ला पसंती दिली. आपल्या आवडीचा दहीवडा आणि इतर पदार्थ घेत त्यांनी भोजन घेतले. ‘समोवार’चा दहीवडा मेदूवडय़ाच्या आकाराचा असे. हे रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या उषा खन्ना बराच वेळ बसून होत्या. त्यांची कन्या देविका भोजवानी आल्या-गेल्यांची विचारपूस करत होत्या. अगत्याने काय हवे काय नको विचारत होत्या. ऋ तूनुसार सजावटीतही थोडा-थोडा बदल करणारे ‘समोवार’ यंदा मार्च संपत आला तरी हिवाळ्यातल्याच पतंग माशांचे चित्र असलेले कागद अशा वस्तूंनी सजलेले दिसते आहे. नवी सजावट न करता आता, काही ग्राहकांना ‘आठवण’ म्हणून या वस्तू दिल्या जात आहेत.
‘समोवार’खेरीज मुंबईच्या कलाजगताचे एक आधारस्तंभ केकू गांधी यांची ‘गॅलरी केमोल्ड’, चेतन नामक चित्रकाराचे तुलनेने सस्त्या चित्रांचे दुकान, नटेशन अँटिक्स हे जहांगीर आर्ट गॅलरीचे पूर्वापार भाडेकरू; त्यापैकी ‘केमोल्ड’ने केकूंच्या हयातीतच नव्या मोठय़ा जागेत बस्तान हलविले. ‘नटेशन’देखील येत्या ऑक्टोबरात हलेल.. पण ‘समोवार’ने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न करूनही निरुपाय झाला. ‘चित्रकलेस प्रोत्साहना’साठीच फक्त जहांगीर कलादालनाची जागा वापरण्याचे बंधन हे दालन चालविणाऱ्या न्यासावर आहे, त्यानुसारच आम्ही पावले उचलतो आहोत, असे ‘जहांगीर’च्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
‘समोवर’ सुरू राहावे यासाठी आम्ही मोठी न्यायालयीन लढाई लढलो. शेजारची मोकळी जागा वर्षांनुवर्षे पडून आहे. किंवा बरोबर वरती अशीच जागा आहे ती दिली तरी चालेल असे सांगितले. पण ‘गॅलरी’वाल्यांनी ऐकले नाही. त्यांना विस्तारासाठी जागा हवी आहे. आता या ७०० चौरस फुटांच्या जागेत त्यांना शिल्पकलेचे दालन सुरू करायचे आहे. ‘समोवर’ने सांस्कृतिक वर्तुळातील मंडळींसाठी हक्काची जागा दिली. एक चहा घेऊन मंडळी तासनतास कलेवर गप्पांचे फड रंगवायची. अशा जागा ही कलाक्षेत्राची गरज असते. पण सरकारला हे मान्य नाही. ‘समोवर’ कलेची सेवा कशी काय करते? असा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही लढाई हरलो असल्याने आता बंद करण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या आईने हे कॅफे सुरू केले होते. ती आज ८८ वर्षांची आहे. ती असेपर्यंत आणखी एक दोन वर्षे ‘समोवर’ सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली असती तर बरे झाले असते, असे देविका भोजवानी यांनी सांगितले.
*  खन्ना या महिलेने १९६४ मध्ये ‘जहाँगीर आर्ट गॅलरी’च्या एका आडोशाला बोळवजा जागेत हे रेस्टॉरंट सुरू केले.
*  १९६०-७० च्या दशकात अनेक नामवंत चित्रकार-लेखक-आर्ट सिनेमावाल्यांचे गप्पांचे फड येथे रंगत. कोलकात्यात ‘कॉफी हाऊस’ तर मुंबईत ‘कॅफे समोवर’ हा एक सांस्कृतिक अड्डा ठरला.
* अमिताभ बच्चन-जया भादुरी हे लग्नापूर्वी या रेस्टॉरंटमध्ये येत.