चांगल्या दर्जाची नाटके रसिकांना बघावयास मिळावी आणि वैदर्भीय कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पर्श या संस्थेने दोन वषार्ंपूर्वी सांस्कृतिक चळवळ सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी नाटय़ रसिकांसाठी पाच दर्जेदार नाटके सादर केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सारंग उपगन्नालवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्श या चॅरिटेबल संस्थेची दोन वषार्ंपूर्वी स्थापना झाल्यानंतर मुंबई आणि पुण्याची दर्जेदार नाटके नागपूरला सादर करण्यात आली असून रसिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भात मराठी नाटय़संस्कृती रुजवावी म्हणून सभासद नोंदणी सुरू केली आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षभरात ११ नाटय़ प्रयोगांचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या काळात दर्जेदार नाटकांची मेजवानी नागपूरकरांना देणार आहे. नागपूरच्या बाहेरची दर्जेदार नाटकाचा आस्वाद रसिकांना घेता यावा या उद्देशाने सभासद नोंदणी संस्थेने सुरू केली आहे.  नागपुरात मुंबई पुण्याची नाटक आणत असताना आर्थिक गणित जमविणे कठीण असले तरी त्यासाठी संस्थेचे सदस्य त्यासाठी प्रयत्न करीत असतात. यावेळी त्या तिघांची गोष्ट, समुद्र या दोन नाटकाशिवाय अन्य दर्जेदार नाटक ऑगस्ट महिन्यापासून सादर केली जाणार आहे. या शिवाय स्थानिक मराठी नाटय़ निर्माता, दिग्दर्शक आणि कलावंतांना समोर आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहेत. नागपुरातील व्यवसायिक नाटकाचे सादरीकरण करण्याचा संस्थेचा मानस आहे. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक आणि विदर्भ विकासात योगदान देणाऱ्या श्रेष्ठ व्यक्तीचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. नाटय़ रसिकांना संस्थेचे सभासद व्हायचे असेल तर त्यांनी अधिक माहितीसाठी २२८८९६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रफुल्ल रेवतकर, विवेक कुन्नावार, अजय उपलचिंवार, विवेक कुणावार, धनंजय ठाकरे उपस्थित होते.