नवी मुंबई क्षेत्रात परिवहन आयुक्त मुंबई यांच्या आदेशानुसार १५ ते २० जूनपर्यंत रिक्षा, टॅक्सी व बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष तपासणीकरिता पिंपरी, चिंचवड, कल्याण व पनवेल येथील पथके नवी मुंबई क्षेत्रातील सीवूड-नेरुळ, रबाले-घणसोली, तुर्भे-वाशी, सानपाडा या ठिकाणी नियुक्त करण्यात आली होती. या वेळी २१ टॅक्सी, १९९ रिक्षा व ३६ बसेस अशी एकूण २७६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ६ टॅक्सी, ४५ रिक्षा व ५ बसेस जप्त करण्यात आली असून १० वाहनांची नोंदणी परवाना रद्द करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांकडून एक लाख ४१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.