प्रभादेवीच्या रवींद्र मिनी थिएटरमध्ये २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘कळसूत्री’ व ‘अ‍ॅसिटेज-इंडिया’ या संस्थांच्यावतीने विश्व बालरंगभूमी दिन व विश्व कळसूत्री दिन साजरा करण्यात येणार आहे.
नाटय़गृहात जाऊन नाटक पाहाणे ही सुद्धा कला असून ती सुद्धा शिकावी लागते. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या रंगभूमीला काही वेगळे सादर करावयाचे असते, काही सांगायचे असते. रंगमंचावर कथाकथनही करता येते. पण त्यातील प्रतिमा व त्याचा अर्थ हा प्रेक्षकांशिवाय समृद्ध होत नाही. म्हणूनच रंगभूमीचे स्थान हे प्रत्येकाच्या बालपणापासून अगदी आयुष्यभरासाठी अढळ असते. याची जागृती बालक व पालकांमध्ये करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ठरविल्यानुसार २० मार्च हा दिवस बालरंगभूमी दिन व २१ मार्च हा दिवस विश्व कळसूत्री दिन म्हणून जगात साजरे केले जातात.
या उद्देशातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस या संस्थांनी बालक व पालकांसाठी विनामूल्य कार्यक्रमाद्वारे साजरा करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘शाळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहाणार आहेत. मुलांसाठी ‘चक् चक् चकवा’, ‘झाले मोकळे आकाश’, आणि ‘ आदर्श गाव’ या नाटिका व ‘माकडांची धमाल’ हा पपेट शो बालक व पालकांसाठी या दिनांनिमित्त विनामूल्य ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ‘कळसूत्री’ च्या मीना नाईक यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.