महिला प्रवाशांची तिकीट खिडक्यांवरील होत असलेल्या गैरसोयींवर उपाय म्हणून मध्य रेल्वेच्या वतीने सीएसटी, ठाणे आणि कल्याण स्थानकात डिसेंबर २०१३ पासून कार्यान्वित विशेष तिकीट खिडक्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी या सुविधेबाबत नीट प्रसिद्धी तसेच पुरेशा सुविधा न दिल्यामुळे कल्याण आणि ठाणे स्थानकांत महिला प्रवाशांना या तिकीट खिडक्या शोधाव्या लागतात, तर महिला प्रवाशांची मोठी गर्दी असलेल्या डोंबिवली स्थानकात ‘महिला विशेष’ तिकीट खिडकीच नसल्याने महिला प्रवाशांना मोठा खोळंबा सहन करावा लागतो. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये रेल्वेच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग यांच्यासाठी प्रत्येक स्थानकात स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध व्हावी, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी संघटनांनी लावून धरली आहे. त्याचेच फलित म्हणून २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये सीएसटी स्थानकात पहिली ‘महिला विशेष’ तिकीट खिडकी कार्यान्वित करण्यात आली तर डिसेंबरमध्ये ठाणे आणि कल्याण स्थानकामध्ये ‘महिला विशेष’ तिकीट खिडक्यांची सोय उपलब्ध झाली. या विशेष खिडकी संकल्पनेला महिला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. सीएसटी स्थानकामध्ये दिवसाला सरासरी ११५०, ठाण्यात ८५० तर कल्याण स्थानकात सरासरी ६५० तिकिटांची विक्री होऊलागली. सीएसटीच्या तुलनेत कल्याण आणि ठाणे स्थानकामध्ये महिला प्रवाशांची संख्या जास्त असली तरी महिला विशेष तिकीट खिडकी सापडतच नसल्याने महिला प्रवाशांना नाइलाजाने सामान्य रांगेत उभे राहून तिकिटांसाठी तासन्तास वाट पाहात राहावे लागते. कल्याण स्थानकामधील ‘महिला विशेष’ तिकीट खिडकी महिला प्रवाशांच्या तात्काळ लक्षात येईल, अशी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्थानकातील तिकीट खिडकीचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे.
प्रशासनाचे अजब तर्कट
 विशेष तिकीट खिडकीवर महिला प्रवासी उभ्या राहिल्या की इतर महिला प्रवाशांना ही ‘महिला विशेष तिकीट खिडकी’ लक्षात येईल, असा अजब खुलासा रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात देण्यात येत असला तरी पहिल्या महिला प्रवाशाने कोणत्या तिकीट खिडकीसमोर उभे राहायचे, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. मध्य रेल्वेच्या मार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र तरीही गेल्या सात महिन्यांपासून येथे विशेष खिडकी सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये असंतोष आहे. डोंबिवलीप्रमाणेच दादर, कुर्ला आणि घाटकोपर या स्थानकांमध्ये त्वरित महिला तिकीट खिडक्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या लता आरगडे यांनी केली आहे. 
       
वेगळी ओळख
सीएसटीतील महिला विशेष तिकीट खिडक्यांना चांगला प्रतिसाद असला तरी कल्याण स्थानकामध्ये या तिकीट खिडक्यांना मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. महिलांना तिकीट खिडक्या लगेच दिसाव्यात यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत असून तीनही रेल्वे स्थानकांमध्ये तशा सूचना देण्यात आल्या आहेत, तर अन्य स्थानकातही तिकीट खिडक्या सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.