महिलांच्या समस्यांकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात विशेष बाह्यरुग्णविभाग सुरू करण्यात येणार आहेत. मे महिन्यात सुरू होत असलेल्या या सहा नव्या विभागांमध्ये जननसंस्थेचे संसर्ग आजार, मासिक पाळी, वंध्यत्व, कर्करोग आदी आजारांसाठी वेगळे कक्ष असतील. त्यामुळे महिला रुग्णांची मोठी सोय होणार आहे. ‘केईएम’च्या स्त्रीरोग व प्रसुती बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे दोनशे स्त्रिया विविध आजारांसाठी येतात. त्यात जठराच्या समस्येपासून कर्करोगापर्यंत अनेक समस्या असतात. यातील सुमारे वीस ते तीस टक्के महिलांना वंध्यत्वाच्या समस्या असतात तर इतर ३० टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या समस्यांनी त्रस्त असतात. त्या महिलांच्या समस्या योग्य त्या तज्ज्ञाकडे पोहोचवून त्याप्रमाणे उपचार करणे आवश्यक ठरते. त्यामुळे एकाच बाह्यरुग्ण कक्षाऐवजी समस्यानुरूप कक्ष सुरू करण्याचा विचार स्त्रीरोगविभागातील डॉ. शशांक परुळेकर यांच्याकडून मांडण्यात आला. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षात स्त्रिया वेगवेगळ्या समस्या घेऊन येत असतात. मात्र काही आजारांसाठी नियमित उपचारांची तसेच अधिक लक्ष पुरवण्याची गरज असते. काही वेळा रुग्ण एकदा येऊन नंतर पुन्हा येत नाहीत. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर उपचार देण्यासाठी या विशेष बाह्यरुग्ण कक्षांची कल्पना समोर आली, असे डॉ. परुळेकर म्हणाले. त्याला रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी तातडीने मान्यता दिली व त्यानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सहा विभागात बाह्यरुग्ण विभाग चालविण्यात येतील. सध्या सुरू असलेल्या स्त्री रोग बाह्यरुग्ण विभागाव्यतिरिक्त हे विशेष रुग्ण असतील. सवरेपचार बाह्यरुग्ण विभागात आलेल्या स्त्री रुग्णांनाही त्यांच्या आजारानुसार या विभागात पाठवण्यात येईल.  मासिक पाळी, पौगंडावस्थेतील आजार, जननसंस्थेचा संसर्ग, वंध्यत्व, जठराचे विकार आणि कर्करोग यासाठी वेगळे बाह्यरुग्णविभाग असून आठवडय़ाच्या एका दिवशी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत ते चालवले जातील. या विभागांसाठी ३० डॉक्टर काम करतील. समस्यानुरूप त्यावर उपाय केले जातील.
सार्वजनिक रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग होत आहे. यामुळे स्त्रियांना त्यांच्या समस्यांविषयी विशेष तज्ज्ञांची थेट व लवकर मदत मिळू शकेल
डॉ. शुभांगी पारकर,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय