नापिकी, कर्जबाजारी आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे विदर्भातील शेतकरी, शेतमजूर आणि त्यांची कुटुंबे निराशाच्या गर्तेत आहेत. आई वडील मोलमजुरी करण्यासाठी शेतावर जाताना शाळेला उन्हाळ्याच्या सुटय़ा असल्यामुळे मुलांना कुठे ठेवावे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. अशा मुलांसाठी नागपूरपासून ६० किलोमीटरवर मांढळजवळील नवेगाव देवी या छोटय़ाशा गावात गंगादेवी मंदिराच्या परिसरात निवासी आध्यात्मिक शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मुलांना अध्यात्माची माहिती देण्यासोबतच त्यांच्यावर संस्कार केले जात आहेत.
गेल्या काही वर्षांत गावातील तरुण पिढी शहराकडे वळू लागली असून पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होऊ लागली आहे. त्यातच त्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेचा विसर पडत चालला आहे. मुख्यत्वे करून तरूण पिढी ही अत्याधुनिक फॅशनकडे आकर्षित होत असताना ते टाळण्यासाठी मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार होण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या सुटीत आई- वडील शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले की मुले मात्र भर उन्हात बाहेर खेळतात. शहरासारखी ग्रामीण भागात काही व्यक्तिमत्त्व किंवा संस्कार शिबिरे होत नाहीत. त्यामुळे या मुलांनी कुठे जावे, हा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर होता. आज सगळीकडे पाश्चात्य संस्कृतीचा भडीमार होत असताना मुलांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण करणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याइतक्या असताना नागपुरात लक्ष्मीनगरात राहणारे कृष्णा कढव यांनी कुही मांढळ परिसरात असलेल्या नवेगाव देवी या छोटय़ा गावात अध्यात्म शिबीर सुरू केले आहे.
प्रारंभीची काही वर्षे मुलांचा प्रतिसाद हवा तसा मिळाला नाही. मात्र, गेल्या पाच सहा वषार्ंपासून शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. २६ मेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ांतील शेतकरी आणि शेतमजुरांची जवळपास ४० मुले सहभागी झाली आहेत. सकाळी पाच वाजता शिबिराला प्रारंभ झाल्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत शिबिराथीर्ंना वेगवेगळ्या विषयांची माहिती दिली जाते. रामरक्षा, मारुती स्त्रोत, सूर्यनमस्कार, हरिपाठ, वारकरी कीर्तन, प्रवचन, संताची चरित्राची माहिती दिली जाते. सुरुवातीला ह.भ.प. बारई महाराजांनी मुलांना मागदर्शन केले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी ह.भ.प. कुऱ्हेकर महाराज यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिबीर सुरू असून ते मुलांना कीर्तन, हरिपाठाचे धडे देत असतात. या शिवाय वारकरी कीर्तन, श्लोक, ज्ञानेश्वरी, दासबोधाचे पारायण आदी विषयाची माहिती दिली जाते. सकाळी व सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात जय जय राम कृष्ण हरी असा गजर करीत सर्व मुले तल्लीन होऊन विठ्ठलाचे नामस्मरण करीत असतात. शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम व खेळ आवश्यक आहेत. शिक्षणासाठी दैनंदिन अभ्यास महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मन शुद्ध राहण्यासाठी, चांगल्या आचार-विचारांसाठी मुलांना प्रवचन, कीर्तनाची गोडी लागायला हवी. त्या दृष्टिकोनातून या शिबिरात कीर्तन, हरिपाठ,  टाळ, मृदंग व पखवाज वाजवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जय जय राम कृ ष्ण हरी.. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.. असा टाळ मृदंगाच्या निनादात गजर करीत विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील दहा ते चौदा या वयोगटातील मुले तल्लीन होऊन देवाचे नामस्मरण करीत आहेत. प्रत्येकाच्या घरात गाय असली तरी त्याचे महत्त्व कळावे या उद्देशाने त्यांना देवलापारला नेले जाते. यावेळी वनवासी कल्याण आश्रमचे शिक्षण प्रमुख रवींद्र संगीतराव, शरदराव पुसतकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर मुलांना माहिती दिली. धोतर, कुर्ता, डोक्यावर टोपी हा पारंपरिक वारकरी पोषाख परिधान करून मुले शिबिरात सहभागी होत असतात. या शिबिरात सहभागी झालेली अनेक मुले गावात वेगवेगळ्या विषयांवर कीर्तन सादर करून आजूबाजूच्या गावात जनजागृती करीत आहेत. लहान मुलांसाठी हे शिबीर आयोजित केले जात असले तरी येणाऱ्या दिवसात २० ते ३० या वयोगटातील शेतमजुरांच्या मुलांसाठी शिबीर घेतले जाणार असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.  हभप अमृत दिवाण गुरुजी यांच्यासह कृष्णा कढव,  शरदराव पुसदकर, श्रीधर धांडे आदी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.