प्रजासत्ताक दिनी देण्यात येणारे जिल्हा क्रीडा पुरस्कार या वर्षी देण्यात येतात की नाही, अशी स्थिती निर्माण झाली असताना अखेरच्या क्षणी म्हणजेच कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार दिले जाणार असल्याची निश्चिती झाली. पुरस्कारप्राप्त खेळाडू व कार्यकर्त्यांना कार्यक्रमासाठी रीतसर आमंत्रण देण्याची औपचारिकताही या वेळी पाळली न गेल्याने पुरस्कारार्थीनी नाराजी व्यक्त केली.

वर्षभरात विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडू, एक क्रीडा कार्यकर्ता आणि एका मार्गदर्शकास प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. याआधी महाराष्ट्र दिनी देण्यात येणारे हे पुरस्कार मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देण्यात येतात. या पुरस्कारासाठी असलेली नियमावली अत्यंत कठीण स्वरूपाची असून जवळपास राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराच्या ती समकक्ष आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळणे हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रतिष्ठेचे ठरते. दरवर्षी कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच या पुरस्कारांची घोषणा केली जाते. परंतु यंदा प्रजासत्ताक दिनास अवघा एकच दिवस बाकी राहिला असतानाही पुरस्कारार्थीची नावे जाहीर न झाल्याने क्रीडा पुरस्कार सोहळा होईल की नाही, याविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. ज्यांची या पुरस्कारासाठी नावे निश्चित मानली जात होती, तेही त्यामुळे संभ्रमित झाले. अखेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ७ वाजेदरम्यान पुरस्कारार्थीना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून फोनद्वारे पुरस्कार मिळाल्याचे कळवून कार्यक्रमास उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. या पुरस्कार्थीमध्ये क्रीडा संघटक व कार्यकर्ता संजय होळकर, क्रीडा मार्गदर्शक जितेंद्र कर्डिले, तलवारबाज अक्षय देशमुख आणि शरयू पाटील यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनी या सर्वाना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. १० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यंदाचे पुरस्कार उशिरा जाहीर होण्यामागे जिल्हाधिकारी विविध कार्यक्रमांमध्ये गुंतल्याने त्यांची लवकर भेट न होणे हे दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय पुरस्कार जाहीर करता येत नसल्याची हतबलताही त्यांनी व्यक्त केली. परंतु जिल्हा क्रीडा पुरस्कारांवर तलवारबाजी या खेळाचा असलेला ठसा यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि पुरस्कार उशिरा जाहीर होण्यामागील तेही एक कारण असल्याची चर्चा आहे. दरवर्षीच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांमध्ये तलवारबाजीसाठी एकंतरी पुरस्कार आढळतो. हा घोळ सुरू असताना दुसरीकडे पुरस्कारार्थीना केवळ फोनद्वारे कळविण्याच्या प्रकाराबद्दल पुरस्कारार्थीनीही नाराजी व्यक्त केली आहे.