दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्यासाठी सज्ज झाले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा २६ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर आणि बारावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. यासाठी बोर्डाच्यावतीने विशेष ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली असून, २३ सप्टेंबरपासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, विषयातील बदल, प्रात्यक्षिक परीक्षा आणि परिक्षेसंबंधी अन्य माहितीकरिता नागपूर विभागीय मंडळाच्या कार्यालयाकडून ‘हेल्पलाईन’ सुविधा पुरविण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक ०७१२-२५६०२०९, २५६५४०३, २५५३४०१, २५५३३६० आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ए.एम. पराते आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सु.मा. पाचंगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सर्व जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्य़ांतील विद्यार्थी या ‘हेल्पलाईन’चा लाभ घेऊ शकतात.
हेल्पलाईनप्रमाणेच पालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच पालकांच्या निकालाविषयीच्या समस्या दूर व्हाव्या व अन्य माहितीसंबंधी पालकांना विचारणा करण्यात यावी, या उद्देशाने समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या समुपदेशन केंद्राची जबाबदारी व्ही.एम. गोस्वामी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. समुपदेशन केंद्राचा क्रमांक ८२७५०३९२५२ असून, सर्व जिल्ह्य़ातील विद्यार्थी तसेच पालकांना याचा लाभ घेता येणार आहे. हे समुपदेशन केंद्रसुद्धा २३ सप्टेंबरला कार्यान्वित होणार आहे.

निवडणूक आदर्श आचासंहिता लागू झाल्यामुळे दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांवर परिणाम होऊ शकतो. ऐन प्रचाराच्या काळातच या परीक्षा होणार असल्याने त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मंडळ कसे उभे करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण याच काळात शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षणसुद्धा होणार आहे.