अपेक्षित प्रश्नसंचासह मार्गदर्शक पुस्तिकेचा मारलेला रट्टा.. शाळा तसेच खासगी शिकवणीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव.. पालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन.. आणि काहींनी सोबत घेतलेली मार्गदर्शक पुस्तिकेतील मोजकीच पाने.. अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. नाशिक विभागातील दोन लाख ६८९३ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडविली. भाषेचा पेपर असताना पहिल्याच दिवशी भरारी पथकाने सात कॉपीबहाद्दरांना पकडले. दरम्यान, मंडळाचा उत्तरपत्रिका नियोजना संदर्भातील १० मिनिटांचा जादा कालावधी ही संकल्पना विद्यार्थ्यांना न समजल्याने काहीशी गोंधळाची स्थिती होती. तसेच मंडळाच्या मदत वाहिनीबाबत वेगळे चित्र नव्हते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मंगळवारपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेची विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनी धास्ती घेतल्याचे पाहावयास मिळाले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनी एकच गर्दी केली होती. यंदा प्रथमच उत्तरपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये, त्यांची भीती कमी व्हावी यासाठी बारावीप्रमाणेच या परीक्षेत १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यात ३० मिनिटे अगोदर घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, बारकोड, होलोक्राफ्ट स्टिकर देऊन त्याची माहिती दिली गेली. पुढील १० मिनिटांत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील तपशील भरावा, नंतरच्या १० मिनिटांत प्रश्नपत्रिका दिल्यानंतर तिचे वाचन करणे अपेक्षित आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोंधळ झाला. उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पाहत अनेकांनी पेपर सोडविण्यास सुरुवात केली. काहींनी आपल्याला काय येते, काय येत नाही याचा अंदाज घेत परीक्षकाची नजर चुकवत परस्परांना शंका विचारण्याची संधी साधली. मराठीच्या पहिल्याच पेपरला कॉपीबहाद्दरांचा बोलबाला राहिला. नाशिक विभागात भरारी पथकाने एकूण सात कॉपीबहाद्दरांना पकडले. त्यात धुळे जिल्ह्यात तीन, तर जळगाव जिल्ह्यात चार जणांचा समावेश असल्याचे मंडळाचे विभागीय सचिव आर. आर. मारवाडी यांनी सांगितले.
दरम्यान, मंडळाने दिलेल्या १० मिनिटांच्या जादा कालावधीविषयी काही विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. पूजा साळगे हिने प्रश्नपत्रिका कशी सोडवावी याचे योग्य नियोजन या काळात करता आल्याचे नमूद केले. प्रवीण गोसावीने या जादा मिनिटांमुळे मराठीची प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली. आधी काय लिहायचे, नंतर काय करता येईल हा विचार करता आल्याचे सांगितले. मयूर ओझरकरने आधीच्या १० मिनिटांत प्रश्नपत्रिका नीट वाचल्याने काही प्रश्नांची उत्तरे चटदिशी सापडली. निबंध, पत्रलेखन हे नंतर करायचे ठरवले. ऋषीकेश भांगरेने १० मिनिटांचा जादा कालावधी दिलाच नसल्याची तक्रार केली. आम्हाला वेळेआधी प्रश्नपत्रिका दिली, पण उत्तरपत्रिकेवर काही लिहूच दिले नसल्याचे सांगितले. संगीता कोरडेने १० मिनिटांचा वेळ मिळाला की नाही हे लक्षात आले नसल्याचे सांगितले.

Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

मदतवाहिनीचा असाही उपयोग
शिक्षण मंडळाने परीक्षा काळात विद्यार्थी आणि पालकांची परीक्षेविषयी भीती कमी व्हावी, यासाठी त्यांना मानसिकदृष्टय़ा गरज भासल्यास आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी मदत वाहिनी सुरू केली आहे. या मदत वाहिनीवर पालकांनी आमच्या पाल्याचे परीक्षा केंद्र दूर का, मुलांचा परीक्षा क्रमांक नेमका कुठल्या शाळेत असेल, मुलाने वर्षभर अभ्यास केला नाही आता कसे करता येईल, असे काही प्रश्न विचारले. काहींनी मुलांच्या ताणतणावात काय करता येईल, त्यांना आहार कसा द्यायचा आदींची विचारणा केली.

जादा १० मिनिटे म्हणजे काय रे भाऊ ?
बारावीच्या परीक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे योग्य नियोजन करता यावे यासाठी नियोजित वेळेअगोदर १० मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी देण्यात आली. मात्र शहर परिसरात बहुतांश विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सोबत का दिली हे समजले नाही. जादा १० मिनिटांचा कालावधी म्हणजे काय हे त्यांच्या गावी नव्हते. परीक्षा झाल्यानंतर बाहेर आल्यावर विद्यार्थ्यांनी एकमेकांना या जादा कालावधीबद्दल विचारणा केली.