पासधारक विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यासोबत वाहकांचे कामही सुलभ करण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळाने मांडलेली ‘स्मार्ट कार्ड’ ही अत्याधुनिक स्वरूपात पास देण्याची योजना कार्डच्या तुटवडय़ामुळे नाशिक जिल्ह्यात अधांतरी बनली आहे.
जिल्ह्यातील केवळ ‘नाशिक १’ आगारात तिची अंमलबजावणी झाली. उर्वरित बारा आगारांमध्ये ‘स्मार्ट कार्ड’ वितरित करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी ७५ हजार स्मार्ट कार्डचा पुरवठा न झाल्यामुळे नेहमीचे ‘कागदी पास’ देऊन काम भागवावे लागत आहे. महिनाभरात मुबलक कार्ड उपलब्ध झाल्यावर या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे.
महामंडळाने पासधारक प्रवाशांना कागदी पास देण्याऐवजी काही वर्ष चांगले टिकू शकतील, या स्वरूपाचे प्लास्टिक स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेंतर्गत देण्यात येणारे चार व सात दिवसाचे पास तसेच मासिक, त्रमासिक आणि विद्यार्थी पास यासाठी आधुनिक स्वरूपाचे हे स्मार्ट कार्ड वापरले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय पातळीवर स्मार्ट कार्डचा वापर सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत गत जानेवारी महिन्यात नाशिक एक आगारात ही यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यानंतर महिनाभरात सर्व आगारांमध्ये ही योजना सुरू करण्याचे नियोजन होते. तथापि, वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या या योजनेची गाडी पाच महिने उलटूनही सुसाट धावू शकली नाही.
प्रारंभीचे काही महिने स्मार्ट कार्डसाठी लागणारी यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यातील १२ आगारांसाठी एकूण १०९ यंत्रणेची मागणी करण्यात आली. ही यंत्रणा विलंबाने उपलब्ध झाल्यानंतर तिच्यात त्या त्या आगाराशी संबंधित मार्ग समाविष्ट करताना कसरत करावी लागली. या यंत्रणेमार्फत पास वितरणाच्या कामाचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर बारा आगारांमध्ये ही यंत्रणा वितरित करण्यात आली. पण, स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्याने उपरोक्त आगारांमध्ये सध्या केवळ १० टक्के काम तिच्यामार्फत केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात पासधारकांची एकूण संख्या तब्बल दीड लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेत केवळ ७५ हजार स्मार्ट कार्ड उपलब्ध झाले. पासधारकांच्या तुलनेत निम्म्याने कमी स्मार्ट कार्डचा पुरवठा झाल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणे अवघड झाले आहे. अंमलबजावणीस विलंब करण्यामागे आधी छपाई केलेले कागदी पास संपविण्याचाही उद्देश असल्याचे सांगितले जाते. पासधारकांची सर्वाधिक संख्या नाशिक शहरात आहे. शहर बस वाहतुकीसाठी ही योजना पूर्णत: लागू होऊ शकली नाही.
ज्या नाशिक एक आगारात, या योजनेची प्रथम अंमलबजावणी झाली, तिथून सहा महिन्यात १८,८१२ स्मार्ट कार्ड पास वितरित करण्यात आले. त्यात विद्यार्थी ४८२८, मासिक ३४१४, त्रमासिक १४३५, ‘आवडेल तिथे प्रवास’ योजनेचे ९०८७ पासधारकांचा समावेश असल्याचे आगारप्रमुख एस. ए. शिंदे यांनी सांगितले. शहर बस वाहतुकीची धुरा वाहणाऱ्या पंचवटी आगारात ही यंत्रणा नुकतीच कार्यान्वित झाली. परंतु, पुरेसे स्मार्ट कार्ड नसल्याने तेथील कामकाज १० टक्के स्मार्ट कार्ड तर ९० टक्के कागदी पास या स्वरूपात सुरू असल्याचे एसटीच्या विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले. नाशिक विभागाने जिल्ह्यासाठी ७५ हजार स्मार्ट कार्डची मागणी नोंदविली असून महिनाभरात ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा पुरवठा झाल्यावर जिल्ह्यात स्मार्ट कार्ड स्वरूपातील पासचे वितरण गतिमान होईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले.

फायदे व तोटे
* कागदी पास भिजून खराब होण्याचा धोका संपुष्टात
* हाताळण्यास सोपे
* स्मार्ट कार्डसाठी ३० रुपये शुल्क
* ओळखपत्रासाठी अतिरिक्त पाच रुपये
* स्मार्ट कार्ड हरविल्यास पुन्हा संपूर्ण खर्चाचा भार

वैशिष्टय़े
* कार्डमध्ये गुप्त सुरक्षा कळ असल्याने त्याचा गैरवापर करता येणार नाही.
* आगारात पासची रक्कम स्वीकारल्यानंतर आवश्यक ती माहिती नोंदवून स्मार्ट कार्ड दिले जाते.
* प्रवासावेळी वाहकाजवळील ‘ईटीआयएम’ यंत्रणेद्वारे पासधारकाकडील स्मार्ट कार्डची नोंद घेतली जाईल.
* रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ प्रणालीवर कार्डचे काम
* मुदत संपल्यावर सहा महिन्यांच्या आत नूतनीकरण आवश्यक
* सलग तीन ते पाच वर्ष एकच स्मार्ट कार्ड वापरता येईल.