एखाद्या राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरदार म्हणून चिकटण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याकडे नवपदवीधरांचा कल वाढतो आहे. अशा तरुणांना विद्यार्थी दशेतच मार्गदर्शन करण्याकरिता मुंबईतील एका महाविद्यालयात ‘स्टार्टअप’ कंपन्यांचेच प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबरला सोमय्या, विद्याविहार येथे हे प्रदर्शन भरेल.
तंत्रज्ञान हा विषय या प्रदर्शनाच्या मध्यवर्ती असेल. त्यामुळे, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा विशेष उपयोग होऊ शकेल. किमान एक महिन्याच्या कामाचा अनुभव आणि तंत्रज्ञान या विषयाशी संबंधित असलेल्या ‘स्टार्टअप’ना यात सहभागी होता येईल. तंत्रज्ञानाशी निगडीत नसलेल्यांनाही या प्रदर्शनात सहभागी करून घेतले जाईल. मात्र, प्रदर्शनाचा मुख्य भर तंत्रज्ञानआधारित उत्पादनांवर असेल. यात ५० स्टार्टअपना सहभागी करून घेतले जाईल. या प्रदर्शनाकरिता नोंदणी करणाऱ्या कंपन्यांच्या अर्जाची पाहणी २५ सप्टेंबरला केली जाईल. याच दिवशी स्टार्टअपना आपल्या कंपनीचा व्यापार वाढविण्याकरिता मार्गदर्शनही केले जाणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कंपन्यांना भांडवल वाढविण्याची संधीही मिळणार आहे. नोंदणीसाठी संपर्क – <http://startupexpo.somaiya.edu/&gt;