संपूर्ण महाराष्ट्र कुपोषणमुक्त करण्यासाठी गावांबरोबरच शहरातही अभियान राबविण्यात येणार आहे. मागच्या वर्षी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबविण्यात आले. त्याचे चांगले परिणाम मिळाल्याने शहरांमध्ये हे अभियान राबवता यावे, यासाठी अभियानाचे स्वरूप, उपाययोजना, नाव सर्व काही बदलण्यात आले आहे. आता हे अभियान ‘राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान’ या नावाने ओळखले जाईल, असे अभियानाच्या महासंचालक वंदना कृष्णा यांनी शनिवारी सांगितले. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वंदना कृष्णा बोलत होत्या. उद्घाटनप्रसंगी लातूरच्या महापौर स्मिता खानापुरे, औरंगाबाद जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती पूनमसिंग राजपूत,  महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, अभियानाचे संचालक डॉ. राजाराम दिघे, विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा आदी उपस्थित होते.