डाव्या कडव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांनी कुणाचे अपहरण केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली असून राज्य व जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
माओवादी व इतर डाव्या चळवळीतील नक्षलवाद्यांकरवी अपहरण व ओलीस ठेवण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यातील मसुद्याप्रमाणे राज्यातही राज्य व जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन गट स्थापन करण्याची बाब राज्य शासनापुढे विचाराधीन होती. अखेर उशिरा का होईना असे गट स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्या  गृह खात्याने घेतला आहे.
राज्य स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन गटाचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव राहतील. राज्याचे पोलीस महासंचालक निमंत्रक राहतील. गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष कृती), इंटिलिजन्स ब्युरोचे सहसंचालक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, मदत व पुनर्वसन सचिव, वित्त खात्याचे प्रधान सचिव तसेच वाटाघाटी पथकाचा एक सदस्य आदी या गटाचे सदस्य राहतील. जिल्हा स्तरावरही आपत्ती व्यवस्थापन गट राहील. जिल्हा दंडाधिकारी या गटाचे अध्यक्ष राहणार असून पोलीस अधीक्षक निमंत्रक राहतील. राज्य गुप्तवार्ता विभागाचा प्रतिनिधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वाटाघाटी पथकाचा सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता, जिल्हा अग्निशमन अधिकारी व गृहरक्षक दलाचे समदेशक आदी या गटाचे सदस्य राहतील.
आपत्ती व्यवस्थापन गटाची भूमिकाही शासनाने निश्चित केली आहे. सुरक्षा व गुप्तवार्ता विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे संबंधित आपत्ती व्यवस्थापन गट अपहरणकर्त्यांची संपूर्ण माहिती गोळा करतील.
प्राप्त गुप्तवार्ता व उपलब्ध उपाययोजना याबाबत परीक्षण करतील. अपहरणकर्त्यांच्या मागण्यांचे मूल्यमापन व परिस्थितीचा आढावा घेतील. आपत्ती व्यवस्थापन गट सर्व संबंधितांना राजकीय नेत्यांसह माहिती देतील व त्यांच्याकडून योग्य सूचना प्राप्त करून घेतील. आपत्ती व्यवस्थापन गट अपहरणकर्ता व त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती करतील व वाटाघाटीच्या पथकास वाटाघाटीबाबतच्या घटकाची माहिती देतील. आपत्ती व्यवस्थापन गट विशेष दलांना (एनएसजी अथवा क्यूआरटी) संभाव्य मदतकार्यासाठी सावध करतील.
आपत्ती व्यवस्थापन गट प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करतील. आपत्ती व्यवस्थापन गट अपहृत कुटुंबांना योग्य ते संरक्षण व सहाय्य करणयासाठी योग्य ती यंत्रणा उभी करतील ज्यायोगे समाजात सरकारी यंत्रणेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल.
या शिवाय विविध स्तरावरील अपहृत स्थितीतील वाटाघाटी आणि संकट निवारणानंतरचे सविस्तर दस्तावेज तयार करण्याचीही जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन गटाला पार पाडावी लागणार आहे.
नक्षलवाद्यांच्या कुठल्याही कृतीस दमदारपणे तोंड देण्यासाठी पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा सज्ज व सक्षम आहेत. माओवादी व इतर डाव्या चळवळीतील नक्षलवाद्यांकरवी अपहरण व ओलीस ठेवण्याच्या घटना घडल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती केंद्र शासनाने निश्चित केली आहे. आपत्ती व्यवस्थापन गट स्थापनेमुळे त्यात अधिक व्यापकता आली आहे. याआधीही पोलीस व इतर शासकीय यंत्रणा एकत्रित तोंड देत होते. आपत्ती व्यवस्थापन गट स्थापनेमुळे त्यास अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांनी व्यक्त केला.