रेल्वेसाठी विजेची मोठी बचत करणाऱ्या आणि प्रवाशांसाठी अधिक वेगवान प्रवासाची हमी देणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाच्या पूर्ततेचा मुहूर्त मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा लांबला आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान डीसी-एसी परिवर्तनासाठी मध्य रेल्वेने ३० जूनची मुदत ठेवली होती. मात्र सुमारे ७५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात राज्य सरकारने आपल्या वाटय़ाचे २२३ कोटी रुपये अद्यापही न दिल्याने हा प्रकल्प रखडल्याचे समजते. परिणामी मध्य रेल्वेवरील लोकलचा वेग रोखला गेला आहे.
पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षीच २५ हजार वोल्टवरील एसी विद्युतप्रवाह सुरू झाला होता. मध्य रेल्वेवर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे या दरम्यान डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचे काम सुरू झाले.
ठाण्यापुढे सर्व गाडय़ा एसी विद्युतप्रवाहावर चालत आहेत. मात्र ठाणे ते मुंबई या टप्प्यात सध्या १५०० वोल्टचा डीसी विद्युत प्रवाह असल्याने या पट्टय़ात गाडय़ांच्या वेगावर मर्यादा येते. तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा इगतपुरीपर्यंत डीसी-एसी इंजिनाद्वारे चालवून त्यापुढे एसी विद्युतप्रवाहाच्या इंजिनावर चालवाव्या लागतात. त्यासाठी इगतपुरी येथे गाडय़ांना जास्त काळ थांबा द्यावा लागतो.
ठाणे ते मुंबई या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर इगतपुरी येथील गाडय़ांच्या थांब्याची वेळ कमी होणार असून त्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक सुधारणार आहे. त्याचप्रमाणे उपनगरीय गाडय़ांचा वेगही वाढणार असून अधिक फे ऱ्या चालवणे रेल्वेला शक्य होणार आहे. हे परिवर्तन झाल्यानंतर रेल्वेलाही प्रचंड आर्थिक बचतीचा लाभ होणार आहे.
मात्र हा सर्व प्रकल्प ७५० कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी २२३ कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. मात्र राज्य सरकारकडून यापैकी एकही छदाम न मिळाल्याने हा प्रकल्प ठरलेल्या तारखेपर्यंत म्हणजेच ३० जूनपर्यंत पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
मात्र लाखो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार येत्या आठवडाभरात हा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्याबाबत राज्य सरकारसह सकारात्मक चर्चाही झाली आहे, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी दिली.