नटश्रेष्ठ दिवंगत प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाटय़संपदा’ या नाटय़संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने येत्या ९ डिसेंबर २०१३ ते ११ जानेवारी २०१४ या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे पहिले वर्ष असून यापुढे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा ‘नाटय़संपदा कला मंच’चे अनंत पणशीकर आणि दाजी पणशीकर यांनी गुरुवारी दादर येथे केली.
शिवाजी मंदिरच्या शिवनेरी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमासंबंधी अधिक माहिती देताना पणशीकरद्वय यांनी सांगितले की, एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कणकवली, पणजी, मिरज, औंध (पुणे) आणि ठाणे येथे होणार आहे. उपांत्य फेरी भरत नाटय़ मंदिर-पुणे येथे तर अंतिम फेरी यशवंत नाटय़मंदिर-माटुंगा (मुंबई) येथे होणार आहे.
‘नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर फिरता चषक’ विजेत्यांना देण्यात येणार असून अंतिम फेरीतील पहिल्या तीन सवरेत्कृष्ट एकांकिकांसाठी अनुक्रमे ५० हजार, ३५ हजार आणि २० हजार रुपये रोख पारितोषिक दिली जाणार आहेत. त्याचबरोबर दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाश, संगीत आणि लेखन विभागाकरिता प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिके दिली जाणार असल्याचेही अनंत पणशीकर यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत अधिक माहिती, प्रवेश अर्ज, अटी याबाबतचा सर्व तपशील  ६६६.ल्लं३८ं२ंेस्र्िं.१ॠ  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरुण पिढीतून नवीन कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ तयार व्हावेत, या उद्देशाने ‘नाटय़संपदा सुवर्णजयंती पुरस्कार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा’ सुरू केली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.