शालेय शिक्षण विभागाच्या दक्षिण विभागाच्या वतीने ‘पुस्तकाने मला काय दिले’ या विषयावर शिक्षकांकरिता राज्यव्यापी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनसंस्कृती, वाचनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ग्रंथमहोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. परळच्या दामोदर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात जवळपास ४०० शाळा सहभागी होतील. या शाळांच्या शिक्षकांबरोबरच विद्यार्थी व पालकही यात सहभागी होणार आहेत.
यावेळी ग्रंथदान योजनाही राबविण्यात आली आहे. सामान्य नागरिक, सेवाभावी संस्था, पुस्तकप्रेमी या करिता ग्रंथदान करू शकतात. या योजनेत संकलित केलेली पुस्तके गरीब, होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली जाणार आहेत.
डॉ. आ. ह. साळुंखे, लक्ष्मण माने, पुष्पा भावे, हरी नरके, रामदास फुटाणे, इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, हेरंब कुलकर्णी, भारत दौंडकर, विश्वास पाटील, निखिल वागळे, महेश केळुसकर, सचिन खेडेकर, मधुकर आरकडे, डॉ. मोनिका ठक्कर आदी मान्यवर यात सहभागी होणार आहेत. शिक्षकांसाठी ‘पुस्तकाने मला काय दिले’ या विषयावर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुस्तके प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही अलौकिक देणगी देऊन गेलेली असतात. पुस्तकांसंबंधी असलेल्या या भावना सार्वजनिक व्हाव्यात यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम १०हजार, द्वितीय ५ हजार आणि तृतीय अडीच हजाराचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यासाठीची शब्द मर्यादा १००० ते १२०० शब्द असणार आहे. २० नोव्हेंबपर्यंत हे निबंध स्वीकारले जातील. निबंध पाठविण्यात पत्ता – शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण विभाग, गिल्डर लेन, मनपा माध्यमिक शाळा, तिसरा मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई ४००००८