प्रस्तावित रस्ता सुरक्षित वाहतूक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी आयोजित संपात वाहतूकदार संघटना व परिवहन सेवेच्या संघटनांनी सहभाग घेतल्याने शहर परिसरात सकाळच्या सत्रात बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर, या संधीचा लाभ उठवीत रिक्षा, टॅक्सीचालकांनी अवाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट केली. या संपामुळे परिवहन मंडळास नाशिकमध्ये सात लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक-वाहक यांच्या मनमानीला चाप बसावा यासाठी नवीन कायदा करण्यात येणार असून या विधेयकास आक्षेप घेत प्रवासी वाहतूक संघटनांनी गुरुवारी संप पुकारला. खासगी वाहतूक संघटनेने संपाला पाठिंबा दर्शविला, परंतु वाहतूक बंद ठेवली नाही. याउलट राज्य परिवहनच्या विविध संघटनांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संपात सहभाग घेतला. परिणामी सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्यांना शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. दुपापर्यंत शहर परिसरातील पंचवटी, आडगाव नाका, सातपूर, नाशिकरोड या आगारांतून शहरात सेवा देणारी एकही बस बाहेर पडली नाही.
सध्या सुटी आणि लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे. प्रवाशांना बस कर्मचारीही संपात सहभागी होणार असल्याची कोणतीच कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले. गुरुवारी लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी बाहेर पडलेल्यांना तसेच बसची वाट पाहत तिष्ठत रहावे लागल्यानंतर अनेकांनी रिक्षा किंवा पर्यायी व्यवस्थेकडे मोर्चा वळविला.
रिक्षा तसेच टॅक्सीचालकांनी या संधीचे सोने केले. नाशिक-त्र्यंबक, नाशिक-गिरणारे तसेच लांब पल्ल्याच्या ठिकाणांसाठी प्रति व्यक्ती दुप्पट, तिप्पट भाडे वसूल करण्यात आले. शहराच्या उपनगरांमधून मध्यवर्ती भागात येण्यासाठी एरवी १५ रुपये असलेले भाडे संपामुळे कुठे २० तर कुठे २५ रुपयांपर्यंत घेण्यात येत होते. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे काही ठिकाणी रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये खटके  उडाले. काहींनी पायी चालणे पसंत करत आपले इच्छित
ठिकाण गाठले. संप मागे घेण्यात आल्यावर दुपारनंतर शहर परिसरातील वाहतूक पूर्ववत झाली. संपामुळे सुमारे तीन ते चार तास राज्य परिवहन सेवा बंद राहिल्याने सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.