येथील बसस्टॅंडमागे असलेल्या डॉ.जयस्वाल लेआऊटमधील भूखंड परिसरातील नागरिकांसाठी खुला ठेवावा, या मागणीसाठी लढा देणाऱ्या नागरिकांना पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या त्या ठरावाला स्थगिती दिली आहे. हा भूखंड रामरक्षा इंग्लिश स्कूलला देण्यात आला होता. २६ ऑगस्ट २०११ रोजी सर्वसाधारण सभेने घेतलेल्या या ठरावाला मुख्याधिकारी स्थगिती देऊ शकत नसल्याने नागरिकांनी हे प्रकरण जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल केले होते. जयस्वाल लेआऊटमध्ये राहणारे डॉ.मधुसूदन सावळे, सतीश नंदकि शोर जैस्वाल, डॉ.प्रदीप कदम, डॉ.सुरेश कपाटे, डॉ.योगेश देविदास शेवाळे, प्रशांत लक्ष्मणराव क्षिरसागर, मोहन कृष्णराव शहाणे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल केले होते.
त्यात त्यांनी नमूद केले आहे की, शेत सव्‍‌र्हे क्रमांक १९ मध्ये असलेल्या डॉ. जयस्वालनगरमध्ये खेळाच्या मैदानाकरिता खुली जागा सोडण्यात आली आहे. त्याचा लेआऊटधारक फिरण्यासाठी व लहान मुले खेळण्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे ती जागा कोणत्याही खाजगी संस्थेत हस्तांतरित वा विक्री करता येत नाही. परंतु, नगरपालिकेने २६ ऑगस्ट २०११ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन हा भूखंड रामरक्षा बहुउद्देशीय क्रीडा व व्यायाम व शिक्षण प्रसारक संस्थेला अस्थायी स्वरूपात भाडय़ाने दिला आहे. या अगोदरच एक भूखंड बुध्दविहार व महात्मा फुले शाळेला दिला असल्याने जैस्वाल लेआऊटमध्ये हा एकच भूखंड शिल्लक आहे. त्यामुळे नगरपालिकेने २६ ऑगस्टला घेतलेला ठराव बेकायदेशीर असून तो रद्द करण्यात यावा व हा भूखंड लहान मुलांना खेळण्यासाठीच राहू द्यावा, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. अर्जदारांची ही मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तत्वत: मान्य करीत नगर पालिकेच्या भूखंड देण्याच्या ठरावाला १० जूनला स्थगिती दिली. अर्जदारांच्या वतीने हे प्रकरण अ‍ॅड. राज देवकर यांनी यशस्वीरित्या मांडले.