यश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’ने माधुरीला तिच्या उतरत्या काळात नवी संजीवनी दिली आणि केवळ माधुरी चित्रपटात असल्याने आपल्याला दुय्यम वागणूक मिळेल या भीतीने नकार देत जुही चावलाने आपली कारकीर्द धोक्यात आणली. सुपरस्टार म्हणून त्यांच्यात तेव्हा स्पर्धा होती आणि त्यामुळे त्यांच्यातले संबंधही तितकेच ताणलेले राहिलेत. आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. जे तेव्हा घडलं नाही ते आज फार सहजतेने घडतं आहे. या तेव्हाच्या ‘सुपरस्टार’ आता एकत्र चित्रपटात काम करणार आहेत, ही एक गोष्ट झाली. पण, आज ‘द माधुरी दीक्षित’ जेव्हा अभिषेक चौबेसारख्या तुलनेने नव्या दिग्दर्शकाबरोबर आणि नवीन कलाकारांबरोबर काम करते तेव्हा मी ‘सुपरस्टार’ आहेच ना, म्हणून इतर लोक माझ्याबरोबर काम करतायत असे मिश्किलपणे का होईना सांगून आपले नाणे अजूनही खणखणीत असल्याचे दाखवून देते आहे. एवढेच नाही तर ‘गुलाब गॅंग’मध्ये माझ्याबरोबर जुहीही आहे म्हणजे मी आणखी एका सुपरस्टारबरोबर काम करते आहे, हेही जेव्हा गमतीने सांगते तेव्हा काळाबरोबर माणसंही शहाणी होत जातात, याची प्रचीती येते.
लग्नानंतर माधुरी दीक्षित-नेने हिने डेन्वर ते भारत असं तळ्यात-मळ्यात करत आपलं नाणं बॉलिवूडमध्ये खणखणीत वाजवून पाहण्याचा प्रयत्न केला. पण, बॉलिवूड आज ज्या पद्धतीने काम करतं आहे ते पाहता इथेच राहून काम केल्याशिवाय मनासारखं काम करता येणार नाही, हे माधुरीला कळलं आणि ती कायमची इथे परतली. पण, मी परतले म्हणजे भारतात परतले..बॉलिवूडमध्ये नाही तेव्हा मला ‘रिटर्न’ म्हणू नका, असं ती बजावून सांगते. त्यामुळे ‘देढ इश्किया’मधली बेगम पारा हे तिच्यासाठी पुनरागमनातलं आव्हान नाही, पण सुपरस्टार म्हणून कारकिर्दीच्या आणि वयाच्याही एका टप्प्यावरची ही वेगळी सुरुवात नक्कीच म्हणता येईल. अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘इश्किया’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये ‘देढ इश्किया’मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
‘इश्किया’ चित्रपट हा विद्या बालनशी जोडला गेला होता. विद्याच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. पण, त्यामुळे ‘देढ इश्किया’मध्ये आपल्या भूमिकेची तुलनी विद्याशी होईल हे माधुरी अमान्य करते. विद्याची कथा मागच्या चित्रपटात संपली होती. या सिक्वलमध्ये तिची व्यक्तिरेखा मी पुढे नेली असती तर ती तुलना झाली असती. मात्र, यात संपूर्णपणे नव्या व्यक्तिरेखांची गोष्ट सांगितली गेली आहे. बेगम पारा ही लखनौमधली अतिशय खानदानी, आपला रूबाब बाळगून असणारी, आपले व्यक्तित्वही स्वत:कडेच सांभाळून ठेवणारी अशी आदबशीर स्त्री आहे, अशा शब्दांत माधुरीने आपल्या भूूमिकेची रूपरेषा मांडली. नसीरुद्दिन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवच वेगळा असल्याचे तिने सांगितले. मी लहान होते तेव्हा त्यांचा ‘मासूम’ पाहिला होता. मग ‘जाने भी दो यारो’, अगदी आत्ताचा ‘वेनस्डे’ असे त्यांचे कितीतरी चित्रपट पाहिले. ‘राजकुमार’ मध्ये आम्ही एकत्र कामही केलं होतं, पण तेव्हा ते खलनायकाच्या भूमिकेत होते. त्यांच्यासारखा चांगला अभिनेता नाही, अशा शब्दांत तिने नसीरुद्दिन शहांचे कौतुक केले. तेवढेच कौतुक तिने दिग्दर्शक अभिषेक चौबेचेही केले. अभिषेकचंच बोलायचं तर तो अगदी छोटय़ा-छोटय़ा गोष्टी, फ्रेममधले तपशील, कलाकारांमधली अभिनयाची देवाणघेवाण अशा बारीकसारीक गोष्टी इतक्या सुंदर रीतीने फ्रेममध्ये आणतो की आहा! तुम्ही पडद्यावर ते पाहताना थक्क होऊन जाता. आम्ही चित्रिकरणासाठी मेहमूदाबादला पोहोचलो. लखनौपासून दोन तास अंतरावर मेहमूदाबाद आहे पण तिथपर्यंत पोहचण्याचा रस्ता अगदी महाभयंकर असा आहे. कच्चा रस्ता आणि तो दररोज पार करून मेहमूदाबाद गाठायचे पण, तिथे पोहोचल्यावर ती हवेली पाहिली आणि यापेक्षा योग्य जागाच असू शकत नाही, हा विश्वास होता. थोडक्यात, जोपर्यंत त्याच्या मनासारखी गोष्ट जुळून येत नाही तोपर्यंत तो पुढे जात नाही आणि एका चांगल्या दिग्दर्शकाची ही खूण असते, असं ती सांगते.
प्रेम, रोमान्स, सामाजिक विषय अगदी नृत्यावर आधारित असे सगळ्या प्रकारचे चित्रपट करून झाल्यानंतर कारिकर्दीच्या या टप्प्यावर चित्रपटांची निवड करताना माधुरी नेमका काय विचार करते? तर कथेपेक्षाही व्यक्तिरेखेची मांडणी मला जास्त आकृष्ट करते असं माधुरी सांगते. व्यक्तिरेखा जर वेगळ्या प्द्धतीने मांडलेली असेल तर निश्चितच तुम्ही वेगळे वाटता आणि लोकांना आकर्षित करून घेता, असे मला नेहमी वाटते. त्यामुळे माझी ही व्यक्तिरेखा कशी वेगळी दिसेल, लोकांना काय आवडेल, याचा नेहमी विचार करत असल्याचे माधुरीने सांगितले. पण, माधुरीसारखी ‘डान्सिंग सुपरस्टार’ बॉलिवूडला सापडलेली नाही..यावर मी आजवर जे काम केलं ते लोकांना आवडलं त्यामुळे ते जेव्हा ‘सुपरस्टार’ म्हणून मला संबोधतात तेव्हा मी ते कौतुक म्हणून आनंदाने स्वीकारते, पण त्याबरोबर येणारं आपलं प्रत्येक काम चांगलंच झालं पाहिजे ही जबाबदारीही मी विसरू शकत नाही, असे सांगणारी माधुरी या स्टारडममागे आपली अथक मेहनतही असल्याचे सांगते.
एक अभिनेत्री म्हणून मी प्रचंड मेहनत घेत होते. नृत्यावरही माझं तेवढंच लक्ष होतं. कुठल्याही आपल्या नृत्यात आधीच्या नृत्यातली स्टेप नसावी, याबाबत मी लक्ष ठेवून असायचे. नृत्यदिग्दर्शिका सरोजजीही माझ्यावर रागवायच्या. त्या मला नेहमी म्हणायच्या, तुझी स्मृती हत्तीसारखी का आहे? कुठलीही मागची छोटी गोष्ट तुझ्या लक्षात राहते. ही स्टेप अमूक एका गाण्यात केली होती, असं त्यांना सांगितलं की मग ठीक आहे, आता मला नव्याने काही शोधावं लागेल, असं त्या म्हणायच्या. मला सांगायचं एवढंच होतं की तुम्ही जेव्हा एवढी मेहनत घेता तेव्हाच त्याचं फळ तुम्हाला ‘सुपरस्टार’ म्हणून मिळतं. सध्या ही सुपरस्टार माधुरी दीक्षित चित्रपट, जाहिराती यांच्याबरोबर आपल्या ऑनलाईन डान्स अ‍ॅकॅडमीमध्ये गुंतली आहे. ‘बेगम पारा’ ही आजच्या माधुरीची सुरुवात बॉलिवूडमध्ये तिला कुठल्या वळणावर नेणार याची तिच्या चाहत्यांनाही तितकीच उत्सुकता आहे.
मी आजवर जे काम केलं ते लोकांना आवडलं त्यामुळे ते जेव्हा ‘सुपरस्टार’ म्हणून मला संबोधतात तेव्हा मी ते कौतुक म्हणून आनंदाने स्वीकारते, पण त्याबरोबर येणारं आपलं प्रत्येक काम चांगलंच झालं पाहिजे ही जबाबदारीही मी विसरू शकत नाही.