गर्दीत चेहरा हरवू न देणाऱ्या, जीवनाच्या प्रवाहात नातेसंबंधांना प्रथम प्राधान्य देऊन त्याचा लेखनातून शोध घेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे उद्या, २८ जुलैला अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. सभा, संमेलने टाळून स्वत:च्या कामामध्ये आत्मसुख शोधणाऱ्या किंवा पुरस्कारांच्या पाठी न लागणाऱ्या आशाताईंचा तटस्थपणा, नेमकेपणाचा अभिजन वर्गामध्ये नेहमीच आदरार्थाने उल्लेख केला जातो. आशाताईंनी साहित्याबरोबरच त्यांच्या मनातील अव्यक्त कोपऱ्यांना ‘लोकसत्ता’शी केलेल्या मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून व्यक्त केले..
आतापर्यंतच्या लेखनातून मानवी संबंधाचा पाहिजे तसा शोध घेऊ न शकल्याने अद्यापही परिपूर्ततेची भावना मनात नसल्याची खंत ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, लेखन म्हणजे शोध. माणसांचा, नातेसंबंधांचा, वृत्ती-प्रवृत्तींचा. या मानवी संबंधांचा शोध घेण्यास अद्यापही योग्य पद्धतीने घेऊ शकले नाही. त्यात एक अपूर्णता वाटतेच. त्यांच्या लेखनातून किंवा प्रत्यक्ष जीवनातूनही त्यांच्यात असमाधानाची भावना नाही. कारण असमाधानात एक प्रकारे तक्रार असते, असं त्यांना वाटतं. मानवीसंबंधांचा एक फार मोठा साक्षेपी पट व्यासांनी महाभारतात उलगडला आहे. त्यात राग, लोभ, आदर्श, स्वार्थ, दु:ख, अन्याय सारखे अगणित पैलू अधोरेखित झाले आहेत. वेगवेगळ्या स्वभावातील कंगोरे आशाताईंच्या साहित्यातून व्यक्त झालेले असताना अनेक नातेसंबंधांचा शोध अद्याप घेता आलेला नाही, असं आशाताईंना वाटतं. यानिमित्त त्यांच्या ‘निसटलेल्या’ कथासंग्रहातील ‘मैत्र’ कथेतील मानवीसंबंधांचा दीर्घ उल्लेख त्यांनी गप्पांच्या ओघात केला.
साहित्य माणसाच्या जगण्याशी थेट भिडलेलं असतं, असं आशताईंचं प्रांजळ मत आहे. जीवन प्रवाही असतं तर साहित्य स्फुरावं लागतं. सत्य आणि कल्पिताच्या मिश्रणातून साहित्याची निर्मिती होत असते. प्रवाही जीवन असणं आणि त्यातून स्फुरणं यांचे बेमालून मिश्रण म्हणजे साहित्य होय. साहित्य सर्वाना स्फुरतंच असं नाही. त्यासाठी त्यांनी स्वत:तच उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या, कवितेवर माझं नितांत प्रेम आहे. इतर साहित्य प्रकारांमध्ये कवितांची पुस्तके जास्त आहेत. सुरुवातीला कविता केल्या. लिहून पाहिल्या. पण साहित्य मूल्याच्या पातळीवर त्या मला न भावल्याने कविता लिहिणं सोडून दिल्या. असं असलं तरी कवितांच्या वाचनानं कवितेतील उत्कटता कधी कधी गद्य लेखनात उमटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुरुष आणि स्त्री लेखकांच्या लिखाणात भेद असल्याचं मुळीच वाटत नाही. आक्रस्ताळेपणा किंवा सतत अन्याय, अत्याचारांविषयीचं रडगाणं लिहिणाऱ्या स्त्री लेखिकांना अपवाद हा शब्द उच्चारणेची चुकीचे ठरेल. इतक्या मोठय़ा संख्येने स्त्री लेखक परखड मते व्यक्त करताना दिसतात. अगदी कुसुमावतीबाई देशपांडेपासून कमल देसाई, गौरी देशपांडे, सानिया अलीकडच्या अरुणा ढेरे यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे देता येतील. दलित आत्मकथांमध्ये उर्मिला पवार यांनी लिहिलेलं ‘आयदान’ किंवा मोनिका गजेंद्रगडकर यांचे लिखाण एक उंची राखून आहे. शेवटी लेखनाची उंची चांगल्या लेखनामुळंच गाठली जाते आणि जे चांगलं असतं ते नेहमी कमी असतं, असं आशाताई म्हणाल्या.
नवकवितेतील प्रतिमा सृष्टी किंवा वापरली गेलेल्या परिमाणांच्या खुणा संत वाङ्मयात खास करून ज्ञानेश्वरीत, दडल्याचे आशाताईंना जाणवतं. ज्ञानेश्वरांनी ‘परिणमले’ किंवा बा.सी. मर्ढेकरांनी ‘रात्र पंक्चरली’ असा उल्लेख केला आहे.
नाम आणि क्रियापदाच्या एकत्रिकरणातून निर्माण झालेल्या या शब्दांनी भाषा सौंदर्यात भर टाकली आहे. परिणमले म्हणजे परिणाम पावले. तसेच मोरोपंतांच्या ‘रुक्मिणीस्वयंवरात’ रुक्मिणीच्या तोंडी ‘शतदा ध्वजा झाले’ असा उल्लेख आहे.
म्हणजे कृष्ण नगरीत आल्यानंतर तरी रुक्मिणीने कित्येकदा खाली वळून पाहिले. भविष्यात यासंबंधीच्या उपक्रमाला न्याय देण्याची त्यांनी इच्छा आहे. पंचाहत्तरीनंतर मानसिक क्षमता तत्पर राहिली तर संशोधनातल्या परिमाणांनी ते नीट सुसंगतपणे मांडून जाणकारांपुढे ठेवावं, हे काम अद्यापपर्यंत झालेलं नाही. शक्य झाल्यास यापुढे त्या त्यासाठीच प्रयत्नरत राहणार असल्याचे आशाताई नम्रतेने म्हणाल्या.