केवळ एका स्टीलच्या रॉडमुळे चुनाभट्टी पोलिसांनी एका महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकला होता. पण तिच्या कमेरत असलेल्या स्टीलच्या रॉडवरून पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून अन्य दोघा आरोपींचा शोध सुरू आहे.
१६ नोव्हेंबर रोजी कुल्र्याच्या कुरेशी नगर येथील रेल्वे रुळाजवळच्या एका झुडपात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. पण शवविच्छेदनामध्ये मृतदेहाच्या कमरेजवळील उजव्या खुब्यात एक स्टीलचा रॉड टाकलेला असल्याचे आढळले. या स्टीलच्या रॉडच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या स्टीलच्या रॉडवर एक क्रमांक होता. त्या क्रमांकाआधारे काळबादेवी येथील सर्जिकल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानातून माहिती घेण्यात आली. हा रॉड गुजराथमधील मगनभाई यांच्या सोनी कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली. या कंपनीत पोलिसांनी जाऊन चौकशी केली तेव्हा २०१२ मध्ये पनवेल येथील संदीप निकम यांना विकल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता कुर्ला नर्सिग होमला हा रॉड पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
या नर्सिग होमचे डॉक्टर समीर शेख यांनी २८ फेब्रुवारी २०१३ रोजी हाफिजा खातून (३०) या महिलेच्या उजव्या पायाच्या खुब्यात हा रॉड बसविल्याची माहिती दिली. त्यामुळे हा मृतदेह हाफिजा खातून या महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. ती विनोबा भावे नगर येथे राहणारी होती आणि १० नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. चुनाभट्टी पोलिसांनी तपास करून हाफिजा खातून यांची हत्या करणाऱ्या वाहिद अब्दुल मजीद शेख (३५) या मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
मयत खातून यांची जागा हडप करण्याच्या उद्देशाने वाहिदने आपल्या दोन साथीदारांसह ही हत्या केली आणि मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तो जाळून टाकला होता. परंतु, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त भीमदेव राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायकोडी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक अनिल गालिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सागळे आदींच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना अटक केली.