विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाने मॉडेल कॉलेजसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असताना अद्यापही मॉडेल कॉलेजला पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थी प्राप्त झालेले नाहीत. मॉडेल कॉलेजसाठी ना इमारत ना विद्यार्थी अशी अवस्था झाली आहे. नागपूर विद्यापीठाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार तीन वर्षांपूर्वी ८ एप्रिल २०११ला ११व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत मॉडेल कॉलेजला मान्यता मिळाली. आता बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत जेमतेम १४ विद्यार्थी मॉडेल कॉलेजमध्ये असल्याचे सांगण्यात येते.
मॉडेल कॉलेजसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १ कोटी ३३ लाख ५० हजार आणि राज्य शासनाने १ कोटी ९३ लाख ८५ रुपये देऊ केले आहेत. त्यापैकी प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ५ कोटी ५० लाख, प्रयोगशाळेकरता २० लाख, ग्रंथालय इमारतीकरता २० लाख, मुलगे व मुलींच्या वसतिगृहाकरता एक कोटी, शिक्षकांच्या वसतिगृहाकरता दोन कोटी ५० लाख, संगणक केंद्रासाठी २० लाख, परिसर विकासाकरता १ कोटी, आरोग्य केंद्राकरता १० लाख, क्रीडा सुविधांसाठी १० लाख आणि इतर कामांसाठी २० लाख असा खर्च विद्यापीठाला करायचा होता. मात्र, अद्यापही एक छदामही खर्च झालेला नाही. दोन्ही विद्यापीठांच्या अंतर्गत कलहातून विद्यार्थ्यांचा कोणताही विकास झाला नाही. झाला तर तोटाच असे एकूण चित्रावरून दिसून येते. गेल्यावर्षी सात प्रवेश झाले होते. त्यावर्षी त्यापेक्षाही कमी प्रवेश झाल्याने आलेला निधी परत जातो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉडेल कॉलेज प्रश्नी चार विधिसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले, प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या संयुक्त बैठका पार पडल्या. त्यावेळी नागपूर विद्यापीठाने गोंडवाना विद्यापीठाकडून जागा भाडय़ाने घ्यावी व भाडय़ाच्या जागेवर मॉडेल कॉलेज सुरू ठेवावे, असे निर्देश प्रधान सचिवांनी दिले होते.
गोंडवाना विद्यापीठ नव्याने स्थापन झाले असल्याने व गोंडवाना विद्यापीठास १२(बी) आणि २(एफ)चा दर्जा मिळण्यास बराच अवकाश असल्याने मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला संलग्नित करण्यास नागपूर विद्यापीठाने नकार दिला. मॉडेल कॉलेज गडचिरोलीसाठी मिळाले असले तरी अद्यापही त्यावर नागपूर विद्यापीठाचीच मक्तेदारी आहे. आतापर्यंत विधिसभा सदस्य डॉ. भूपेश चिकटे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र दोन समित्या नेमून गडचिरोली मॉडेल कॉलेजसाठी भाडेपट्टीवर घेण्यात येणाऱ्या इमारतींची पाहणी करण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपवली होती. जागा मिळाली. मात्र, अद्यापही मॉडेल कॉलेज सुरू होणे बाकी आहे.