प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर व्यक्ती ‘आत्मचरित्र’ लिहायला घेते, पण एखाद्या ठिकाणी काम करताना ते कौतुकास्पद ठरेल आणि प्रसिद्धीच्या वलयात शिरल्यानंतर वेळ मिळणार नाही म्हणून ‘आत्मचरित्र’ लिहायला हाती घेणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मात्र, एका नागपूरकर कलावंताने ही कामगिरी केली. अर्थातच, आत्मचरित्र लिहून पूर्ण झाले नाही, पण आयुष्यात घडलेल्या किस्स्यांची मांडणी मात्र सुरू झाली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे तब्बल १८ पुरस्कार पटकावणाऱ्या ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका असलेले वीरा साथीदार यांनी अशा एक नव्हे, तर अनेक किस्स्यांची पोतडी आणि त्यातील गुपिते लोकसत्ताजवळ मोकळी केली.
दिवंगत महानायक राजेश खन्ना यांचा ‘आनंद’मधील एक संवाद आहे, ‘ये जीवन एक रंगमंच है, और हम सब उस रंगमंच की कठपुतलीया’. असाच काहीसा अनुभव वीरा साथीदार यांच्याशी बोलतानासुद्धा येत होता. खेडय़ात राहत असताना रानावनात गाई चारायला जायचो. दिवसभर गाई चरत राहायच्या आणि मी आपला निसर्गाशी संवाद साधायचो. शाळेत जावे लागू नये म्हणून घरच्यांना व शिक्षकांना अगदी पटेल अशी कारणे द्यायचो.
याला तुम्ही काय नाव द्याल? चित्रपटात हे दृश्य म्हणून साकारताना तो अभिनयच असतो ना? मागासलेल्या, बदनाम वस्तीत आमचे राहणे. शाळेतून घरी आल्यावर आईवडील कामावरून परत येईपर्यंत भावंड आणि घर सांभाळणे. त्यातून विरंगळा हवा म्हणून बरोबरीची सर्व मुले एकत्र येऊन भजन, तमाशाच्या चमूला आवाज देणे. गुराख्याचे काम सोडून शहरात औद्योगिक कामगार म्हणून रुजू झालो आणि कामगारांचे नेतृत्त्व हाती आले. तेव्हा मालकांकडून मागणी कशी मान्य करवून घ्यायची, हे साभिनय साथीदारांना पटवून देत होतो. या प्रत्येक गोष्टीत अभिनय दडलेला होता, पण यालाच अभिनय म्हणतात, हे ठावूक काही नव्हते. दरम्यान, चित्रपटांची गोडी त्यावेळी लागली. सहा रुपयाच्या मजुरीत एक रुपया चित्रपटाला, असे गणित जमवले. त्याचवेळी मॅक्झिम गॉर्कीची ‘आई’ वाचनात आली आणि येथून आयुष्याला दिशा मिळाली. वाचनाने प्रचंड झपाटले. अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान अशी सगळ्या विषयाची, हिंदी, इंग्रजी, मराठी लेखकांची बरीचशी पुस्तके वाचून काढली. चळवळीत काम करताना अनेक व्यक्ती आयुष्यात जोडल्या गेल्या.

शाळकरी, गुराख्यापासून तर औद्योगिक कामगार होईस्तोवर आयुष्यात अभिनयच करत आलो, पण त्याला व्यावसायिक जोड २०१३ मध्ये मिळाली. अभिनयाच्या चाचणीसाठी बोलावणे आले आणि नाकारले. तरुणाईने पुन्हा साद घातली म्हणून गेलो आणि पदरात मुख्य भूमिका पडली. या चित्रपटाला एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ पुरस्कार मिळाल्याची वार्ता कळली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा डोळे पाणावले. दहा महिन्यांच्या नोकरीनंतर पदरी पडले नसते एवढे पैसे चित्रपटाने दिले. कधी घडला नसता तो विमान प्रवास घडवला, पण त्याहीपेक्षा निखळ आनंद या चित्रपटाने दिला.     

ईश्क, शादी और दर्द – ए – दिल
घर असूनही १४ सदस्यीय मित्रांच्या घरात ते राहायला गेले, पण तेसुद्धा खाणे आणि झोपण्यापुरतेच! याच मित्रांशी संवाद साधताना एक पैज लागली. मित्र म्हणाला, मुली मुलांना पटवतात आणि वीरा म्हणाले, मुले मुलींना पटवतात. अवघ्या आठ दिवसात शेजारच्याच अनिता राजला (त्यांनी त्यावेळी दिलेले नाव) पटवले. त्यांच्यासाठी ती पैज होती, पण ती भावनिकरीत्या गुंतली. यांनीही मग ते गांभीर्याने घेतले आणि गझलांचे गुलाब यांच्या खिडकीतून तिच्या अंगणात पडायला लागले. दसऱ्याला ती आपटय़ाचे पान त्यांच्यासाठी ठेवून गेली. त्याच आपटय़ाच्या पानावर यांनी तिला प्रेमपत्र लिहिले. प्रत्यक्षात बोलणे किंवा गाठीभेटी नसल्या तरी ही देवाणघेवाण मात्र सुरू होती. इकडे घरी लहान भावाचे लग्न जमल्यामुळे त्याच्याआधी मोठय़ाचे लग्न व्हावे म्हणून यांच्यावर दबाव आणला गेला. कशीतरी जुळवाजुळव करून लग्नाचे प्रमाणपत्र बनवले खरे, पण घरी बायको म्हणून कुणाल नेणार, तर शेवटी त्यांची अनिता राज मदतीला धावून आली. त्यांचे हेच प्रेमपत्र १९८६ मध्ये एका दिवाळी अंकातही छापून आले.