पनवेलमधील खुटारी गावात एका पाचवर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यांनी बळी घेतल्यानंतर या कुत्र्यांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरात पाच वर्षांत पन्नास हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावे घेतले असल्याचे उघड झाले आहे. मे २०१२ रोजी पालिकेने केलेल्या गणनेनुसार नवी मुंबईत तीस हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते, पण मागील तीन वर्षांत कुत्र्यांची पैदास थोपविण्यात पालिकेला यश येऊ न शकल्याने ही संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे पादचारी, दुचाकी प्रवाशांना रात्रीच्या वेळी आजच्या घडीला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो आहे. या गंभीर समस्येवर नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठविला खरा, पण तो कारवाईपर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्यामुळे १८ नागरिकांच्या वाटय़ाला एक भटका कुत्रा त्रास देत असल्याचे चित्र आहे.
देशातील छोटय़ा मोठय़ा शहरात भटक्या कुत्र्यांनी एक दहशत निर्माण केल्याचे दृश्य आहे. त्यामुळे प्रारंभी या कुत्र्यांना ठार मारण्यास सुरुवात करण्यात आली होती, पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध केला. त्यामुळे कुत्र्यांच्या पैदासीवर नियंत्रण मिळविणे इतकेच स्थानिक प्राधिकरणांच्या हाती आता शिल्लक राहिले आहे. नवी मुंबई पालिका त्यासाठी गेली वीस वर्षे प्रयत्न करीत आहे, पण त्यात पालिकेला सपशेल अपयश आल्याचे दिसून येते. त्यामागे जागेचे प्रमुख कारण असून सध्या तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंडच्या कोनाडय़ात सुरू असलेले निर्बीजीकरण अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिवसाला दीड हजार भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. ती केवळ ६०० कुत्र्यांवर होत आहे. माजी आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी हे शहर भटकी कुत्री मुक्त करण्याचा विडा उचलला होता, पण नगरसेवक आणि जनतेच्या विरोधामुळे तो गुंडाळण्यात आला. सानपाडा येथेही निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सभागृहाने नामंजूर केला. कोपरी येथील जुने केंद्र मोडकळीस आल्याने त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने तीन उड्डाणपूल, एक जुन्या डम्पिंग ग्राऊंडची जागा पाहण्याचा प्रयत्न केला पण स्थानिक नगरसेवकांनी त्याला खोडा घातला. शहरातील भटक्या कुत्र्यांची पैदास कमी व्हावी यासाठी त्यांचे मोठय़ा प्रमाणात निर्बीजीकरण हाच एकमेव पर्याय असून त्यासाठी विस्तीर्ण जागेची गरज आहे. ही जागा मिळवून देण्यासाठी एकाही नगरसेवकाने प्रयत्न केलेला नाही. निर्बीजीकरण करताना होणारा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या त्रासामुळे आजूबाजूचे नागरिक या केंद्राला विरोध करीत असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या केंद्राजवळील मोकळी जागा या केंद्राला सोयीस्कर पडणार असून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली गेली आहे, पण या प्रश्नाने आता उग्र रूप धारण केले आहे. नवी मुंबईतील उड्डाणपुलांच्या खालील जागादेखील मागण्यात आली होती, पण त्यासाठीही नकारघंटा वाजवण्यात आली. सात वर्षांत ८१ हजार ५७७ श्वानदंशांच्या तक्रारी पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झालेली आहेत. त्यामुळे शहरातील ११ लाख नागरिकांपैकी सरासरी १८ नागरिकांना एक कुत्रा भीतीखाली ठेवत आहे.