घरी अठरा विसे दारिद्रय़, आईवडिलांपैकी कोणी आजारी, व्यंग असल्याने रोजीरोटीची भ्रांत.. त्यामुळे रेल्वेस्थानक, देऊळ आणि रस्त्यांवर भीक मागण्याशिवाय किंवा किरकोळ वस्तू विकण्याशिवाय पर्याय नाही, अशी त्या मुलांची परिस्थिती. पण आता घरच्या अनंत अडचणींवर निर्धाराने मात करून ‘त्यांनी’ हे सारे सोडून शिक्षणाची कास धरली आहे. भिक्षामार्गाचा त्याग करून १३२ मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेण्यात ‘प्रथम’ या सामाजिक संस्थेबरोबरच मुलांचे पालक आणि शिक्षकांचेही मोठे योगदान आहे. मुंबईत महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये आता ही मुले अभ्यासाचे धडे गिरविण्यात रंगली आहेत.
सिग्नलवर किंवा अन्य ठिकाणी भीक मागणारी व किरकोळ व्यवसाय करणारी लहान मुले मुंबईत सर्वत्र दिसतात. त्यांची वेळोवेळी सुटका केली जाते, पण पुढे काहीच होत नसल्याने पुन्हा ती मूळ मार्गावर जातात, हा अनुभव आहे. सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क प्रदान केला, तरी या मुलांच्या आयुष्यात कोणताच फरक पडत नव्हता. त्यामुळे यंदाच्या मार्चमध्ये सोडविण्यात आलेल्या ५८४ मुलांना शिक्षणाच्या वाटेवर नेण्याचे ‘प्रथम’ने ठरविले. या मुलांच्या घरी जाऊन पालकांशी बोलणे आणि त्यांची संमती मिळविणे, हे कठीण काम होते, पण आमच्या कार्यकर्त्यांनी ते केले.
काही ठिकाणी आनंदाने होकार मिळाला, तर काहींनी शिव्याशापही दिले, असे ‘प्रथम’ च्या फरिदा लांबे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
अथक प्रयत्नांनंतर १३२ मुलांना शहरातील महापालिकेच्या विविध शाळांमध्ये जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी पावले टाकली. ही मुले अजूनही शाळेत टिकून असून आता या मुलांनी भीक मागण्यासाठी हात पसरणे सोडून दिले आहे. जेमतेम पोटाची खळगी भरण्यापुरत्या किरकोळ व्यवसायाने दिवस पार पडेल, पण भविष्य उभे करता येणार नाही, याचीही त्यांना खात्री पटली आहे. म्हणूनच, आता ही मुले न कंटाळता अभ्यास करताना दिसतात. त्यामध्ये त्यांचे पालक आणि शिक्षकांचेही मोठे श्रेय असल्याचे लांबे यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आता ‘प्रथम’ने मंगळवारी शीव-कोळीवाडा येथील समाजमंदिर हॉलमध्ये छोटेखानी सत्काराचे आयोजन केले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या साऱ्यांना गौरविण्यात येईल, असे सांगतानाच ही मुले आता शिक्षणवाटेवर ‘मार्गस्थ’ होतील, असा विश्वास लांबे यांनी व्यक्त केला.