राजकीय वरदहस्त लाभल्याने फेरीवाल्यांनी ऐरोलीतील पदपथ गिळंकृत केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास महापालिका अधिकारीदेखील धजावत नसल्याने सामान्य नागरिकाला वाहनांचा सामना करीत रस्त्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.
फेरीवाल्यांच्या माध्यमातून हक्काची व्होट बँक तयार होत असल्याने राजाश्रय मिळाल्याने त्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. खरेतर सायबर सिटीतील पदपथ काबीज करून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे विद्रूप झालेले आहेत. यात ऐरोलीमधील शाळांजवळील पदपथच या फेरीवाल्यांनी बळकावल्याने विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होत आहे. सेक्टर १५, सेक्टर १७ मध्येदेखील फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत. ऐरोली सेक्टर १, ऐरोली नाका येथेदेखील परप्रांतीय फेरीवाल्यांनी पदपथ गिळकृंत केले आहेत. ऐरोली सेक्टर ३ मधील जी विभाग कार्यालयापासून ते दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्यावरूनच चालावे लागते. ऐरोली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला ठाणे-बेलापूर मार्गालगत फेरीवाल्यांनी आपले बस्तानच मांडले आहे. ऐरोली सेक्टर ५ मधील अधिकृत असलेल्या जय भवानी जनता मार्केटला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून वारंवार कारवाई करण्यात येते, पण कारवाई झाल्यांनतर फेरीवाले पुन्हा आपले बस्तान या ठिकाणी मांडतात.
 साहेबराव गायकवाड,
 विभाग अधिकारी, ऐरोली

रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेरीवाले पदपथ अडवून बसत असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून घरी येत असताना मोठी कसरत करत यावे लागते.
 प्रदीप बोरकर, नागरिक