मुंबई पोलिसांनी शहरात नाइट लाइफला परवानगी दिली आणि नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या परवानगीमुळे शहरात रात्रभर हॉटेल्स, पब्ज उघडी राहणार, असा लोकांचा समज आहे. परंतु मुळात नाइट लाइफ ही संकल्पना नीट स्पष्ट झालेली नाही आणि गैरसमज झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. काही ठरावीक भागात ही परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबईकरांची ती आवश्यकता असल्याने तशी परवानगी देण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
रात्रीच्या लाइफ स्टाइलने मुंबईत कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, पोलिसांवर ताण पडेल, असा आरोप केला जातो. परंतु पोलिसांना तो मान्य नाही. संपूर्ण शहरात जर नाइट लाइफला परवानगी असेल तर निश्चित ताण येईल. पण ही परवानगी ठरावीक भागात लागू आहे. त्यामुळे ताण येणार नाही. एरवीही पब्ज ३ वाजेपर्यंत असतातच. शिवाय रात्री पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्ती या असतात, असे एका पोलीस उपायुक्तांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत अनधिकृतरीत्या हॉटेल्स सुरू असतात. पोलिसांना हप्ते देऊन गल्लीबोळात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स सुरू असतात. लोकांची तेथे गर्दी असते. त्यामुळे पोलिसांचे असे हप्ते बंद होणार आहेत.
 पंचतारांकित हॉटेल्स, पब्ज रात्रभर सुरू असतात. या ठिकाणी जाणारा एक वर्ग आहे. ते मद्यपान करतात आणि मध्यरात्री घरी परततात. त्यामुळे या नव्या निर्णयाने फार फरक पडणार नाही, याकडे एका पोलीस अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
 तर हा निर्णय घेण्यापूर्वी खालच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही विश्वासात घ्यायला हवे होते, अशी नाराजी एका पोलीस उपायुक्ताने व्यक्त केली.
 सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मध्यंतरी शहरातील रात्रीचा पब्जमधील धांगडधिंगा आणि अनैतिक प्रकार बंद पाडायला सुरुवात केली होती. हॉकी स्टीकमुळे ते चर्चेत आले होते. नाइट लाइफ सुरू केल्याने काय फरक पडणार आहे, अनैतिक प्रकार तर सध्याही सुरू आहेतच, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ज्याला
असे प्रकार करायचे त्याला परवानगीची गरज नसते. पण हॉटेल्सना परवानग्या मिळाल्याने महसुलात वाढ होईल असेही ते म्हणाले.