रेल्वेमार्गावरील वाढत्या अपघातांचे आणि अपघातांती मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी आता मध्य रेल्वेने वेगळी उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सर्व उपनगरीय गाडय़ांमध्ये आता स्ट्रेचरची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक गाडीच्या किमान दोन ते तीन डब्यांमध्ये स्ट्रेचर ठेवण्यात येणार असून, त्यामुळे दोन स्थानकांमधील अपघातांत जखमी झालेल्यांना त्वरित स्ट्रेचरवरून जवळच्या स्थानकापर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांत दरवर्षी तब्बल चार हजार लोक जखमी होतात आणि तेवढेच लोक मृत्युमुखी पडतात. या आकडेवारीबाबत देशाच्या संसदेतही चर्चा झाली आहे. त्यानंतर रेल्व मंत्रालयाने ही बाब गंभीरपणे घेत अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्येही दोन स्थानकांदरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे.
दोन स्थानकांदरम्यान अपघात झाल्यास तातडीची वैद्यकीय मदत पुरवणे शक्य होत नाही. अपघातग्रस्तांसाठी अपघात झाल्यानंतरचा पहिला एक तास ‘सुवर्ण तास’ मानतात. या पहिल्या तासात योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास जखमी प्रवाशाचा जीव वाचण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र दोन स्थानकांदरम्यान अपघात झाल्यास जखमींना जवळच्या स्थानकापर्यंत नेण्यासाठी स्ट्रेचरही नसतात. त्यामुळे अनेकदा जखमी रुग्ण दगावतात. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय गाडय़ांमध्येच स्ट्रेचरची सोय केली होती. जागेचा विचार करून रेल्वेने एका डब्यातील एका आसनावरच स्ट्रेचर ठेवला होता. त्यामुळे बघणाऱ्यांना ते आसनच वाटत असे. मात्र आणीबाणीच्या प्रसंगात त्याचा उपयोग स्ट्रेचरसारखा करता येणे शक्य आहे. हे स्ट्रेचर दोन-तीन गाडय़ांच्या एकाच डब्यात बसविण्यात आले होते.
आता मध्य रेल्वेने हे स्ट्रेचर आपल्या प्रत्येक उपनगरीय गाडीत बसविण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील प्रत्येक गाडीत सुरुवातीचा, शेवटचा आणि मधला अशा तीन डब्यांमध्ये हे स्ट्रेचर बसविण्यात येतील. दोन स्थानकांदरम्यान अपघातात जखमी झालेल्यांना त्यामुळे नक्कीच दिलासा मिळेल. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी केले. आता लवकरच मध्य रेल्वेच्या गाडय़ांमध्ये स्ट्रेचरची व्यवस्था होणार आहे.