राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या नागपुरात आयोजित कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेतील शिपाई ते अधिकारी तसेच कार्यक्रमात सहभागी एकाही व्यक्तीला ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नसून अतिशय कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रपती येत्या १६ नोव्हेंबरला नागपुरात येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेची धावपळ सुरू आहे.
नागपूर महापालिकेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, देशभरातील क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांच्या रजत महोत्सवाची सांगता तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ हे तीन मोठे कार्यक्रम राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत अनुक्रमे यशवंत स्टेडियम, कस्तुरचंद पार्क व अमरावती मार्गावरील सुभेदार सभागृहाजवळील मैदानात होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अत्यंत कडक सुरक्षा राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. विमानतळापासून ते राजभवन तसेच कार्यक्रम स्थळ ते राजभवन या दरम्यान रस्त्यांवर तैनात सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, वाहन चालक, कार्यक्रमात सहभागी प्रत्येक सुरक्षा जवान, पोलीस अधिकारी व शिपाई, इतर शासकीय अधिकारी तसेच प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्राच्या आधारेच प्रवेश राहणार आहे.
राष्ट्रपतींची सुरक्षा यंत्रणा, केंद्रीय गुप्तचर खाते, रॉ, तसेच केंद्रीय व राज्य गृह खात्यांतर्गत येणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणा राष्ट्रपतींच्या बंदोबस्तावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याशिवाय राष्ट्रपती भवन तसेच राजभवनचे अधिकारी रोज त्याचा आढावा घेत आहेत. विमानतळ ते राजभवन, राजभवन ते कार्यक्रमस्थळ या संपूर्ण मार्गात, कार्यक्रमस्थळी बंदोबस्तात राहणारे शिपाई ते अधिकारी, व्यवस्थेत असणारे लोक, इतर अधिकारी व पदाधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आदी प्रत्येकाची यादी तयार केली जात असून त्यांची छायाचित्रासह ओळखपत्रे तयार करणे सुरू झाले आहे. या प्रत्येक व्यक्तीची खडान्खडा माहिती सुरक्षा यंत्रणेकरवी तपासली जात आहे.
नागपूर शहराला दहशतवादी तसेच नक्षलवाद्यांकरवी असलेला धोका लक्षात घेता राष्ट्रपतींच्या दौऱ्यात कुठलाही अडथळा येणार नाही, याची सुरक्षा यंत्रणेकरवी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विविध हालचालींचा गुप्तचर यंत्रणेकरवी कानोसा घेतला जात आहे. महाविद्यालय प्रवेशबंदीवरून विद्यापीठातील सुंदोपसुंदी सुरू असून दीक्षांत कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून उपद्रव करू पाहणाऱ्या संशयितांची नावेच यंत्रणेने मागून घेतली. विद्यापीठच नव्हे तर स्वतंत्र विदर्भाची मागणी सतत केली जात आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेता अशा हालचालींवरही यंत्रणेची नजर आहे. कार्यक्रम स्थळाभोवतालचा परिसर तसेच राष्ट्रपती ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावरील प्रत्येक इमारती तसेच ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर राहील. हवाई सुरक्षेवरही भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.