दहावीच्या बीजगणिताच्या पेपरफुटीचा आणि त्याच्या अहवालाचा हे दोन्ही मुद्दे सध्या गाजत आहेत. अहवालात पेपरफुटीचा स्रोत कोण, याचा शोध लावण्याऱ्या मंडळाच्या चौकशी समितीच्या हातीदेखील तो लागू शकलेला नाही. ही पेपरफुटी केवळ एकाच विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न निकाली निघाल्याने लाखो विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे. गेल्या वर्षी अंबरनाथ येथील पेपर फुटीच्या सूत्रधाराला पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत जेरबंद केले होते. मात्र पेपरफुटीच्या सूत्रधाराला पकडण्यास कांदिवली पोलिसांना अद्याप यश का आले नाही, अशी चर्चा सध्या मंडळात सुरू आहे. कांदिवलीमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यांकडे बीजगणिताचे सी आणि डी असे दोन संच आढळून आले. विद्यार्थ्यांने सी संच असलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे एका कागदपत्रावर सोडवून आणली होती. हा कागद पोलीस ठाण्यातील केसपेपर असल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांने सी संचातील उत्तरे लिहून आणली होती, मात्र प्रत्यक्षात त्याच्या हातात डी संच असलेली प्रश्नप्रत्रिका हाती पडल्याने तो अधिक गोंधळला होता. महत्त्वाचे म्हणजे त्याने लिहून आणलेली उत्तरे हीदेखील चुकीची असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. कॉपी पकडल्यानंतर पेपर वडिलांनी दिला असल्याचे सुरवातीला या विद्यार्थ्यांने सांगितले होते. यांनतर हा पेपर बोरिवली रेल्वे स्थानकात ५०० रुपयांना घेतल्याचे सांगितले. या दोन्ही जबाबामध्ये दोन तासांचे अंतर आहे. यादरम्यान चारकोप पोलीस ठाण्यातील एक अधिकारी या विद्यार्थ्यांला भेटून गेले होते. त्यानंतरच त्याने आधीच्या जबाबात बदल केल्याची धक्कादायक माहिती ही मंडळाच्या या अधिकाऱ्याने दिली. विद्यार्थ्यांकडे असलेल्या कॉपीतील अक्षर कोणाचे आहे, याचा मागोवा घेतल्यास पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचतील असेही त्यांनी सांगितले. मंडळाच्या अहवालात पेपरफुटीचे नेमके कारण समोर न आल्याने पोलिसांच्या तपासात काय समोर येते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे मंडळाच्या शिक्षा नियमावलीनुसार या विद्यार्थ्यांवर दोन किंवा तीन परीक्षेला बसू न देण्याची कारवाई होऊ शकते. या संदर्भात मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.