शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला आपला रक्तगट माहीत असणे आवश्यक असल्याचे म्हटल्याने उरण तालुक्यातील इयत्ता १ ली ते १२वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करून रक्तगटांनी नोंद करण्यात येत असून त्याकरिता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. शासकीय रुग्णालयाने दिवसाला फक्त ५० मुलांचेच रक्तगट तपासणार असल्याचे जाहीर केले आहे.
हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळा बुडवून त्यांना उरण शहरात आणावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत पंचायत समितीच्या वतीने शाळांमध्येच रक्तगट तपासणी करण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रक्तगट तपासणी मर्यादित कालावधीतच पूर्ण करण्याचे आदेश असल्याचे शाळांना कळविण्यात आल्याचे शाळांचे म्हणणे आहे. परंतु या संदर्भात काही आदेश आलेले आहेत का, अशी विचारणा उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. एम. प्रभे यांच्याकडे केली असता रक्तगट तपासणीचे कोणतेही मुदतीचे आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची तपासणी शाळेतच जाऊन केली जाईल, त्यासाठी किट उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रभे यांनी दिली.