व्हॅन वा ऑटोरिक्षातून मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सर्रास सुरूच असून वाहतूक पोलिसांची कारवाई मात्र नगण्य आहे. जीवघेण्या घटनेची वाट पाहिली जात आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे.
शासनाच्या मोटार परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी नवे धोरण तयार केले आहे. त्यानुसार बहुतेक शाळांनी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बसेस ठेवल्या आहेत. तरी व्हॅन, ऑटोरिक्षा व सायकल रिक्षातूनही मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सर्रास वाहतूक केली जाते. अपघाताचे हेसुद्धा कारण असल्याचे उघड झाले आहे. ऑटोरिक्षातून पाच विद्यार्थ्यांना नेण्यास परवानगी आहे. काही व्हॅन्स चालकांशी शाळांनी करार केले आहेत. असा करार न करणाऱ्या ऑटो रिक्षा वा व्हॅन्स चालकांची संख्याही मोठी आहे. प्रत्यक्षात त्यात विद्यार्थी कोंबलेले असल्याचे चित्र शहरात रोजच दिसते. विद्यार्थ्यांंची दफ्तरे वाहनाच्या बाहेर निघालेली दिसतात. विद्यार्थ्यांंना वाहनामध्ये निट हालचालही करता येत नाही. बरेचदा वाहन चालकांच्या शेजारी विद्यार्थ्यांंना बसविलेले दिसते. सायकल रिक्षा तसेच ऑटोरिक्षांबरोबरच व्हॅनमधून परवानगी नसतानाही त्यात विद्यार्थ्यांची ने-आण होत असल्याचे दृश्य शाळांसमोर रोजच दिसते. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवलेले असते.
विद्यार्थ्यांंची अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक व्हॅन्समध्ये अवैध गॅस सिलेंडर्स लावलेले असल्याचेही पोलिसांपासून लपून राहिलेले नाही. हे माहिती असूनही वाहतूक पोलीस गांभिर्याने कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आठ विद्यार्थ्यांना नेण्यास परवानगी देण्याची मागणी ऑटो रिक्षा चालकांची आहे. आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने विद्यार्थी संख्या वाढवून द्यावी, आठपेक्षा जास्त विद्याथी कुणी नेत असल्यास त्या ऑटो रिक्षांवर पोलिसांनी जरूर कारवाई करावी. स्टार बस तसेच विविध वाहनातूनही मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेले जातात. पोलीस थातूरमातूर कारवाई करतात, पण त्यांनी अवैध वाहतूक मात्र बंद केलेली नाही, अशी या वाहन चालकांची भावना आहे. पालकही यास तितकेच जबाबदार आहेत. शाळांशी करार न झालेल्या वाहनांमधून ते त्यांच्या पाल्यांना पाठवून जीवघेणी जोखीम घेत आहेत. पाल्य ज्या वाहनात जातो त्यात किती विद्यार्थी बसवले जातात, याची खात्री देखील ते करीत नाहीत. चार पैसे कमाविण्याच्या नादात स्वत:च्या व विद्यार्थ्यांच्या जीवाशी ते खेळत असतात.
मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या वाहनांवर कारवाई होत असली तरी ती नगण्यच आहे. कारवाई होऊनही पुन्हा ही वाहने रस्त्यावर धावतात कशी, असा प्रश्न आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक कोणतीही असो ती घातकच आहे. असे असले तरी अपघाताची शक्यता लक्षात घेता सर्वानीच विशेषत: वाहन चालक वा मालक तसेच पालकांनीही काळजी घ्यावयास हवी. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी नेणारे ऑटोरिक्षा चालक वा व्हॅन चालक असो, त्यांच्या रोजगारावर गदा आणायची नाही. मात्र, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईलच, असे त्यांनी स्पष्ट केले.