मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या दहावी, बारावी परीक्षा आणि याच काळात नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेले इच्छुक उमेदवारांचे कार्यक्रम यामुळे प्रत्येक प्रभागांत गोंधळ सुरू असून विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणारे मोठय़ा आवाजातील डीजे, लाऊड स्पीकर यामुळे हे भावी नगरसेवक केवळ मतांचा विचार करताना विद्यार्थ्यांचा विचार करणार आहेत की नाही, असा एक सवाल उपस्थित केला जात आहे. आचारसंहितेच्या भीतीपोटी १११ प्रभागांत दिवसाला छोटे-मोठे चार सरासरीच्या हिशोबाने ४०० कार्यक्रम होत आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
नवी मुंबई पालिकेची पुढील महिन्यात निवडणूक होत असून तिची आचारसंहिता या आठवडय़ात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी इच्छुक उमेदवारांनी सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. त्यात हळदीकूंकू हा या भावी नगरसेवकांचा आवडता कार्यक्रम झाला असून अनेक ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या ऑर्केस्ट्राचे जोरात प्रदर्शन सुरू आहे. रविवारी या कार्यक्रमांनी तर कहर केला असल्याचे दिसून आले. केव्हा नव्हे तो जागतिक महिला दिनाचा आणि त्याचबरोबर शिवजयंतीचा पुळका या भावी नगरसेवकांना आला होता. ७ फेब्रुवारीला प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर या कार्यक्रमांचा वेग वाढला असून प्रत्येक प्रभागात प्रमुख चार पक्षांचे सात-आठ उमेदवार इच्छुक असल्याने कार्यक्रमांचा दणक्यात बार उडविला जात आहे. याच काळात दहावी-बारावीच्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या असून जानेवारी-फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची रूपरेषा आखली आहे. यानंतर शालेय तसेच महाविद्यालयीन परीक्षा सुरू होणार आहेत. नवी मुंबईतील घरांची उभारणी सेक्टरनिहाय करण्यात आल्याने इमारतींचे बॉक्स तयार झाले आहेत. या बॉक्समध्ये लाऊड स्पीकर किंवा डीजेसारखी मोठी आवाजाची यंत्र लावल्यानंतर हा आवाज मोठय़ा प्रमाणात घुमला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण होत असल्याने काही समजदार उमेदवारांनी आपल्या कार्यक्रमांच्या जागा बदललेल्या आहेत तर काही जणांनी ते रद्द केले आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा या महिनाअखेर संपणार आहेत, त्यानंतर शालेय व कॉलेजच्या परीक्षा सुरू होणार असल्याने हा महिना विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने घरातच अभ्यासाची परीक्षा बघणारा ठरणार आहे. या धागंडधिंगाण्याला एकाही पक्षाने किंवा संघटनेने विरोध केलेला नाही. त्यामुळे सब घोडे बारा टक्के असल्याचे दिसून येत आहे.