बसच्या चाकाखाली पाय सापडल्याने विद्यार्थिनी जखमी
शहर बसच्या चाकाखाली पाय सापडून इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याच्या घटनेमुळे धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या शालेय बस वाहतुकीचा मुद्दा पुन्हा प्रकर्षांने पुढे आला आहे. एसटी बस खचाखच भरल्यावर आतमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या चिमुरडय़ांचा कोणताही विचार न करता बहुतेक चालक गर्दीतून ती पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. रविवार कारंजा, शालिमारसह अनेक थांब्यांवर हे चित्र पाहावयास मिळते. त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळ गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार टाळण्यासाठी चालकांवर नजर ठेवण्याबरोबर बसमध्ये विद्यार्थ्यांना शिस्तबद्धपणे प्रवेश मिळावा म्हणून खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. बसमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू असताना कोणत्याही स्थितीत बस दामटवू नये, अशी सक्त सूचना चालकांना देण्यात आली आहे.
शहर बस वाहतुकीच्या बसेसमधून हजारो विद्यार्थी दररोज जो प्रवास करतात, तो पाहिल्यावर ही वाहतूक किती धोकादायक बनली आहे ते लक्षात येते. बसमध्ये जागा मिळविण्यापासून सुरू होणारा ‘द्राविडी प्राणायाम’ दारात लटकून प्रवास करण्यापर्यंत सुरू राहतो. त्यात शालेय विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. सोमवारी सायंकाळी सहा वाजता शालिमार येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण. सारडा कन्या विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी ऋतुजा शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली होती. शालिमारच्या थांब्यावर बस पकडण्यासाठी नेहमीसारखी कसरत करताना गर्दीत कोणाचा तरी धक्का लागल्याने ती खाली पडली आणि याचवेळी चालकाने बस सुरू केल्यामुळे तिचा पाय चाकाखाली सापडला. अपघातानंतर नागरिकांनी जखमी झालेल्या ऋतुजाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, परिचारिकांच्या संपामुळे या ठिकाणी त्वरित उपचार होणे अवघड असल्याचे लक्षात आल्यामुळे तिला द्वारका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, त्यावर शस्त्रक्रियाही करावी लागणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन जखमी ऋतुजाच्या पालकांना तातडीची मदत म्हणून एक हजार रुपये दिले. वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन एसटी अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे ऋतुजाचे वडील विजय शिरसाठ यांनी सांगितले. याप्रकरणी बसचालक प्रकाश सांगळे यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताने एसटी बसमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

चालकांवर आता महामंडळाची ‘नजर’
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीदरम्यान निष्काळजीपणे बस चालविणाऱ्या चालकांवर नजर ठेवण्यासाठी एसटी महामंडळ रविवार कारंजा आणि शालिमार यासारख्या विद्यार्थ्यांची गर्दी होणाऱ्या थांब्यांवर स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती पंचवटी आगाराचे व्यवस्थापक रमेश अहिरे यांनी दिली. संबंधित कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये शिस्तबद्धपणे प्रवेश मिळावा याचीही दक्षता घेतील. अपघातग्रस्त बसचालक प्रकाश सांगळे यांना तातडीने प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातविरहित सेवेसाठी महामंडळ चालकांना वारंवार प्रशिक्षण देत असते. समुपदेशकाचीही मदत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी अपघातविरहित सेवा देणाऱ्या चालकांचा महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. दुसरीकडे वारंवार अपघात करणाऱ्या चालकांची वेतनवाढ रोखली जाते. त्याला बढती दिली जात नाही. या शिवाय, गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास चालकास थेट सेवेतून कमी करण्याचा अधिकारही महामंडळाकडे आहे. शालिमार येथील अपघातामुळे शहर बस वाहतुकीवरील सर्व चालकांना बस प्रवाशांनी खचाखच पूर्णपणे भरली असली, तरी ती थांब्यावर गर्दीतून पुढे नेऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. ज्या प्रवाशांना म्हणजेच विद्यार्थ्यांना अशा बसमधून प्रवास करावयाचा आहे, त्यांना प्रवेश देऊन मगच गर्दीतून बस संथगतीने पुढे न्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

सुरक्षित शालेय बस वाहतुकीचे ‘तीनतेरा’
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व सुसह्य करण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून मांडला गेलेला मध्यवर्ती भागातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या उपक्रमाचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत. मध्यवर्ती भागातील बहुसंख्य शाळा व्यवस्थापन वेळापत्रकात बदल करण्यास राजी नसल्याने थांब्यांवर एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होते आणि त्याची परिणती मग बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चढाओढ होण्यात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा उपक्रम अपयशी ठरण्यात शाळा व्यवस्थापनाप्रमाणे एसटी महामंडळही तितकेच जबाबदार असल्याची सार्वत्रिक भावना आहे. तसेच प्रारंभी मोठा गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पुढे त्याची काय बिकट अवस्था झाली, याचा विचार करण्याचेही औदार्य दाखविले नाही.
मध्यवर्ती भागातील सुमारे ४० ते ५० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शहरातील सर्वच भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांच्या वेळा एकसमान असल्याने शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी मध्यवर्ती भागातील थांबे विद्यार्थ्यांच्या गर्दीने ओसंडून वाहतात. या कालावधीत एसटी महामंडळ काही जादा बसगाडय़ा सोडत असले, तरी विद्यार्थी व चाकरमान्यांच्या संख्येच्या तुलनेत बसचे प्रमाण तोकडेच असते. गर्दीतून बसमध्ये प्रवेश मिळविणे ही दररोजची कसरत असते. त्यात चालक समोरील गर्दी पाहून अनेकदा बस थांब्याहून पुढे उभी करतात. तेव्हा विद्यार्थ्यांची कशी धावपळ उडते ते कोणत्याही थांब्यावर पाहावयास मिळते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गतवर्षी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिक्षण संस्था चालक आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक बोलाविली होती. त्यात एसटी महामंडळाने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या कालावधीत सर्व भागात जादा बस फेऱ्या मारण्याचे मान्य केले तर संस्था चालकांनी एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी शाळांच्या वेळापत्रकात काही मिनिटांचे अंतर ठेवण्याचे कबूल केले. त्यानुसार मध्यवर्ती भागातील शाळांचे नवीन वेळापत्रक तयार झाले. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे हा उपक्रम काही दिवस सुरू राहिला. पुढील काळात मात्र परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ बनली. बैठकीत वेळेत बदल करण्याचे मान्य करणाऱ्या बहुतेक शाळांनी आपल्या जुन्या वेळापत्रकाची पुन्हा अंमलबजावणी सुरू केली. परिणामी, हा संपूर्ण उपक्रम कोलमडून पडला. बस थांब्यांवर एकाच वेळी होणारी गर्दी म्हणजे उपक्रम कोलमडल्याचा परिपाक असल्याचे एसटी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था वगळता अन्य शिक्षण संस्थांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याने बस थांब्यावर नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची गर्दी उसळते. याचवेळी नोकरी व अन्य कामानिमित्त घरी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची गर्दी होते. या कालावधीत कितीही वाढीव बसेस सोडल्या तरी ही स्थिती बदलणार नसल्याचे खुद्द एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात
आले. या उपक्रमाचा गवगवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नंतर उपक्रमाकडे दुर्लक्ष केले. याचा जाच बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.